राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रानंतर लाभक्षेत्रावरही पावसाने काहीशी विश्रांती घेतली. परिणामी धरणातून सुरू असलेलला विसर्ग कमी करण्यात आला आहे. 1200 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. जायकवाडीला आतापर्यंत 9583 दशलक्ष घनफूट पाणी मुळा धरणातून वाहिले आहे. मुळा धरणाचा साठा 25 हजार 857 दशलक्ष घनफुटांवर स्थिर राखत उर्वरित आवक होणारे पाणी नदीद्वारे जायकवाडीकडे वाहत आहे. (Latest Ahilyanagar News)
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने थांबा घेतला आहे. परिणामी केवळ 758 क्युसेक इतकीच आवक लहित खुर्द येथील मुळा नदीपात्राद्वारे धरणात जमा होत आहे. लाभक्षेत्रावर पावसाने काहीसा थांबा घेतला आहे. परंतु शुक्रवारी सकाळच्या सत्रात रिमझिम सरी कोसळल्याने विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. 1200 क्युसेकने नदीत पाणी सोडले जात आहे. धरणसाठा 25 हजार 857 दशलक्ष घनफूट(99.45 टक्के) झाला आहे. धरणाची पूर्ण क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट आहे. 1 ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वाधिक स्रोत असलेले मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधानाची परिस्थिती आहे. दुसरीकडे वांबोरी चारी सातत्याने सुरूच असल्याने जिरायती क्षेत्राचे नंदनवन करण्यासाठी हे पाणी लाभदायी ठरणार आहे. दोन पंपांद्वारे पाणी वाहत असून आतापर्यंत वांबोरी चारीला 263 दशलक्ष घनफूट पाणी खर्च झाले आहे.
यापूर्वी खरीप हंगामाला धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे आवर्तन सोडले गेले होते. उजव्या कालव्याला 3433 दशलक्ष घनफूट तर डाव्या कालव्याला 443 दशलक्ष घनफूटइतके पाणी खर्च झाले. त्यानंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर शेतकऱ्यांची पाणी मागणी थांबली. त्यामुळे धरणाचे दोन्ही कालवे सध्या बंद आहेत. धरणाचे दरवाजे व वांबोरी चारी वगळता इतर सर्व विसर्ग बंद आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने पूर्णपणे थांबा घेतल्याचे चित्र आहे. लाभक्षेत्रावरही आकाश आभ्राच्छादित असले, तरी रिमझिम सरी वगळता पाऊस थांबला आहे. त्यामुळे पाणीवाढ थांबलेली आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून पाझर पाण्याची तुरळक आवक सुरू आहे. त्यामुळे पावसाने पूर्ण थांबा घेतल्यास विसर्ग बंद केला जाईल. परतीचा पाऊस पुन्हा कोसळल्यास धरणाच्या दरवाज्यांतून विसर्ग वाढवला जाणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.
चिंता वर्तमानाची, समाधान भविष्याचे
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पिके जलमय करून टाकली. कर्ज काढून खर्च केल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके परतीच्या पावसाने हिरावून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वर्तमानाची चिंता भेडसावत आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भविष्यात पुरेसे पाणी मिळेल याचे समाधान मात्र आहे.