Rahuri Illegal Soil Transport Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Illegal Soil Transport: मुळा धरण परिसरात अवैध माती वाहतूक; ग्रामस्थांनी पकडला डंपर

कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा पुढाकार; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: मुळा धरणाच्या दरडगाव थडी येथील पात्रातून शेकडो ब्रास मातीची विनापरवाना वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेरीस म्हैसगाव ग्रामस्थांनी डंपर पकडून दिला. डंपर राहुरी महसूल प्रशासनाकडे जमा झाला. परंतु कारवाईबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने शंका-कुशंका व्यक्त होत आहे.

मुळा धरणाच्या बॅकवॉटर हद्दीतील दरडगाव थडी, म्हैसगाव, शेरी चिखलठाण हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती व माती उपसा केला जात आहे. विशेषतः माती उपसा करताना कोणी विचारपूस केल्यास माती तस्कर मांजरी व डिग्रस हद्दीतील रॉयल्टी पावत्या दाखवत असल्याचे बोलले जात आहे. महसूल प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. मंडलाधिकारी, तलाठी यांच्याकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. परंतु संबंधितांनी ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून रेती व माती तस्करांना उघड पाठिंबा दिल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.

दै. पुढारीमध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पाटबंधारे प्रशासनाने मुळा पात्रात पाहणी केली. त्यांनी कोणतीही कारवाई न करता धरण पात्रामध्ये अवैध उत्खनन झाल्याचे सांगत धरण तटाला डंपर उभे असल्याचा अहवाल दिला. धरणातून माती वाहतूक करणारे ४ डंपर पाटबंधारे प्रशासनाने पकडूनही सोडून दिले. त्यावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी असे पत्र पाटबंधारे प्रशासनाने महसूल विभागाला दिले. या पत्रव्यवहारातून टोलवाटोलवी होत असताना कारवाई मात्र शून्य होती. अखेरीस प्रशासनाचे पाठबळ पाहता ग्रामस्थांनीच पुढाकार घेत बाजार तळावर मातीने भरलेला डंपर पकडला. संबंधित डंपरचालक अल्पवयीन असल्याची चर्चा होती. ग्रामस्थांनी डंपर तलाठ्याच्या ताब्यात दिला.

या कारवाईबाबत मंडलाधिकारी योगेश भालेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गौण खनिज विभागाचे कर्मचारी प्रशांत औटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सायंकाळपर्यंत कारवाई झाल्याच्या वृत्ताला नकार दिला. सायंकाळी डंपर आणून लावल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणूक कामाचा व्याप असल्याने कारवाईची माहिती देणे शक्य नसल्याचे सांगत औटी यांनी कारवाईबाबत गुप्तता पाळल्याचे दिसत आहे. दरम्यान, दै. पुढारीच्या वृत्तामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाल्याने धरण पात्राची पाहणी करणे, गावामध्ये फेरफटका मारण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे. त्यामुळे लगतच्या गावांमधील ग्रामस्थांनी दै. पुढारीचे आभार व्यक्त केले आहे.

रॉयल्टीच्या पावत्या मांजरी व डिग्रस हद्दीतील

मुळा पाटबंधारे प्रशासनाला डंपर चालकांनी दाखवलेल्या रॉयल्टी पावत्या या राहुरी तालुक्यातील मांजरी व डिग्रस हद्दीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या रॉयल्टीच्या पावत्या वापरत माती तस्कर मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये धुडगूस घालत आहेत. सर्व डंपर विनाक्रमांक दिसत असल्याची माहिती पाटबंधारे प्रशासनाने दिली.

महसूल प्रशासनावर नेमका दबाव कोणाचा?

कारवाई झाल्यानंतरही मंडलाधिकारी योगेश भालेकर यांनी माहिती देण्याबाबत प्रतिसाद दिला नाही. महसूल प्रशासनाशी संपर्क साधला कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने नेमका प्रशासनावर दबाव कोणाचा? याबाबत चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT