पाथर्डी: मुळा धरणातील गाळ काढून अतिरीक्त पाणी मिळविण्यावर जलसंपदा विभाग लक्ष केंद्रित करीत आहे. वांबोरी चारीवरील शेवटच्या गावालाही पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे म्हणून बुस्टर पंप बसविण्याबाबत सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भविष्यात उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांवरील विजेचा भार कमी करण्याचे स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे 14.60 कोटी रुपयांच्या निधीतून वांबोरी चारी टप्पा 1 च्या कामाचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आ. मोनिका राजळे, आ.संग्राम जगताप, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अक्षय कर्डिले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, की वांबोरी चारीच्या कामासाठी स्व.कर्डिले यांचा पाठपुरावा होता. पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून या कामाला गती मिळाली होती. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न या जुन्या लोकांनी पाहिले होते. मुळा धरणाच्या 52 कि.मी.लांबीच्या कालव्यांची अवस्था जीर्ण झाली आहे.
कालव्याचे अस्तरीकरण खराब झाल्याने या कामासाठी 110 कोटी रूपये मंजूर झाले असून त्या कामालाही सुरुवात झाली आहे. आज शुभारंभ झालेल्या टप्पा 1 च्या कामाला 14.60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, मुळा धरणात अतिरिक्त पाणी निर्माण करण्यावर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी राज्यातील धरणांतून गाळ काढण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाची लवकरच मंजूरी मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर मुळा धरणाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामुळे दोन ते अडीच टीएमसी पाणी निर्माण होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
वांबोरी चारीवरील उपसा सिंचन योजनेच्या वीज बिलांचा प्रश्न दूर करण्यासाठी 150 मेगावॉट क्षमतेच्या फ्लेोटिंग सोलार प्रकल्प उभारण्याचा विभागाचा विचार आहे. मढीपर्र्यंत पूर्ण क्षमतेने पाणी जात नेण्यासाठी घाटशिरसजवळ बुस्टर पंप बसविण्यासाठी सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.
आ.मोनिका राजळे यांनी पाण्याच्या बाबतीत असलेल्या प्रश्नाचा उल्लेख करून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अक्षय कर्डिले म्हणाले, की स्व. कर्डिले यांच्याप्रमाणेच तुमच्या सेवेत राहाण्याचा प्रयत्न करीन. विखे राजळे जगताप परीवाराच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार आहे.
माझ्यासारखे अक्षयचे होऊ देऊ नका: डॉ. सुजय विखे पाटील
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, की वांबोरी चारीच्या प्रश्नाचे गांभीर्य स्व. कर्डिले यांनी सातत्याने मांडले. त्यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या कामाच्या शुभारंभाला ते नाहीत याचे दुःख आहे. पण भविष्यात माझे जे झाले ते अक्षयचे होऊ देऊ नका, याची जाणीव करून द्यायला आलो आहे. पराभव झाला असला तरी वांबोरीच्या चारीला निधी देवून कामाचा शुभारंभ करायला विखे परीवारालाच यावे लागल्याचा टोला डॉ सुजय विखे यांनी लगावला.