chargesheet Pudhari
अहिल्यानगर

Dheeraj Pardeshi Case: धीरज परदेशी खूनप्रकरणी ७५० पानांचे दोषारोपपत्र; खून व कट रचल्याचा आरोप

१३ संशयित आरोपींचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील मुकुंदनगर येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी गेलेल्या महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूनसिंग परदेशी यांच्या खूनप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी १३ संशयित आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात सुमारे ७५० पानी दोषारोपपत्र दाखल केले. खून व कट रचणे यासह विविध आरोप दोरारोपत्र पत्रात ठेवण्यात आले आहेत.

मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, युनूस खान साहेब शेख, ख्वाजामिया उर्फ अक्रम याकुब सय्यद, वसीम रहीम सय्यद, इम्रान मुसा सय्यद, जाहीर नुसरत शेख, मोहम्मद रशाद इमरान सय्यद, अरमान लिकायत सय्यद, हुजैफ साजिद शेख, अबजीमिया याकूब सय्यद, राहील कलीम शेख (सर्व रा. मुकुंदनगर) असे दोषारोपपत्र दाखल केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

शहरातील मुकुंदनगर येथे दर्गा दायरा परिसरात ७ ऑगस्ट रोजी महापालिकेचे विद्युत विभागाचे कर्मचारी पथदिवे दुरुस्तीसाठी गेले होते. त्यात कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचाही समावेश होता. पथदिवे दुरुस्तीचे काम सुरू असताना धीरज परदेशी यांच्यावर टोळक्याने हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांचा ९ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्ते व परदेशी कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कार्यकर्त्यांनी शहर बंद ठेवून डीएसपी चौकात रास्ता रोको केला. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य तीन संशयितांना हैदराबाद येथून ताब्यात घेतले.

त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून अन्य संशयितांना अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण १३ संशयित आरोपींना अटक केली.

गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून सुमारे ७५० पानी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याचा तपास भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी पूर्ण केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT