Mirajgaon Ganja Seizure Pudhari
अहिल्यानगर

Mirajgaon Ganja Seizure: मिरजगावात 18 लाखांचा गांजा जप्त; ब्रिजखाली सापळा रचून दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 25.43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, मोटारकारसह चार गोण्या जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मिरजगाव शहराजवळ मिरजगाव - कर्जत रस्त्यावरील ब्रिजखाली सापळा लावून 18 लाखांच्या गांजासह 25 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर, दोघांना ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिल्या होत्या. त्यानुसार कबाडी यांनी पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलिस अंमलदार ह्रदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले.

पोलिस पथकास माहिती मिळाली की, एका अलिशान मोटारीतून दोघेजण गांजा विक्रीकरिता कर्जत येथून पाथर्डीकडे जाणार आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने मिरजगाव पोलिसांची मदत घेत कर्जत-मिरजगाव रस्त्यावर ब्रिजखाली सापळा लावून अलिशान मोटारकार अडविली. त्यातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सुखदेव शिवनाथ कदम (वय 30), गणेश अंकुश कराड (वय 32, रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर), अशी नावे सांगितली. मोटारीतून गांजा असलेल्या चार गोण्या जप्त केल्या.

आरोपींकडून 18 लाख 18 हजारांचा गांजा, दोन मोबाईल, 7 लाखांची मोटारकार असा 25 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT