नगर तालुका: एका गुरुजींचे मेडिकल बिल.. कार्यालयातून ते गहाळ.. त्यानंतर गुरुजीचा संताप.. माहितीचा अधिकार.. तक्रार.. चौकशी समिती.. सुनावणी आणि अखेर ‘आपापसांत मिटवून घ्या’ असा प्रशासनाचा सल्ला! या सगळ्या घटनाक्रमात निवृत्तीला अवघे सहा महिने बाकी असलेल्या ‘त्या’ महिला कर्मचाऱ्याने अखेर आपल्या गळ्यातील गंठण मोडले आणि ३० हजारांची रक्कम ‘त्या’ गुरुजींच्या स्वाधीन केली. आता गुरुजींनीही ‘माझी तक्रार नाही’ असे लेखी दिल्याचे समजते; परंतु ते पत्र अजून ‘रेकॉर्ड’वर येत नसल्याने महिला हवालदिल झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षक वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. खरे तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका मेडिकल बिलापासून झाली. शिक्षक नेता असलेल्या त्या गुरुजींनी आपले मेडिकल बिल संबंधित विभागातील ‘त्या’ महिला कर्मचाऱ्याकडे दिले होते. मात्र, बरेच दिवस उलटूनही बिल मिळत नसल्याने गुरुजीने पाठपुरावा वाढवला. यातून ते बिल गहाळ झाल्याचे समोर आले. आता गुरुजींने संबंधित महिला कर्मचाऱ्याला धारेवर धरले आणि ‘बिलाची सोय करा,’ अशी भूमिका घेतली.
महिलेला काही सुचेना, बिल खरेच गहाळ झाले, की कोणी जाणीवपूर्वक नेले, यावरून त्याही गोंधळून गेल्या. इकडे गुरुजींनी वरिष्ठांकडे तक्रार केली, जिल्हा परिषदेतून बीडीओंच्या नावाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे महिला कर्मचारी आणखी गडबडली. त्यांच्या निवृत्तीला अवघे सहा महिने शिल्लक आहेत. पेन्शनच्या कागदपत्रांना किंवा निवृत्ती लाभांना या प्रकरणाचा फटका बसू नये, या भीतीने त्या महिलेने ‘त्या’ गुरुजींकडे प्रकरण मिटवून घेण्याची विनवणी केली. चर्चा सुरू असताना एक विचित्र तोडगा समोर आला.
‘तुमच्याकडून मेडिकल बिल गहाळ झाले आहे. आता मूळ बिलाची रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे त्या बदल्यात तुम्हीच मला पैसे द्या,’ अशी भूमिका गुरुजींनी घेतली. महिलेने नाहक झंझट नको, म्हणून आपल्या गळ्यातील गंठण मोडले आणि 30 हजार रुपये उभे करून गुरुजींना बोलावून घेतले. गुरुजी स्वतः कार घेऊन आले. महिलेला कारमध्ये बसवले आणि आनंदऋषी हॉस्पिटल परिसरात नेले.
नंतर तिच्याच हाताने पैसे कारच्या डिकीत टाकायला सांगितल्याचे समजते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सन्माननीय गुरुजींनी ‘मोठ्या मनाने’ (!) आपली तक्रार मागे घेत असल्याचे लेखी दिले. त्यामुळे महिलेचा जीवही भांड्यात पडला. मात्र, गुरुजींनी दिलेले लेखी पत्र अजूनही प्रशासकीय इमारतीपर्यंत पोहचलेले नाही. त्यामुळे प्रकरणही संपलेले नाही. आता ‘ती’ महिला पुन्हा हतबल झाली असून, ‘कोणीतरी मला यातून बाहेर काढा’, अशी आर्त साद घालत आहेत.
एका गुरुजीचे मेडिकल बिल गहाळ झाल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. याबाबत बीडीओंना पत्र काढून खुलासा मागवला आहे. या प्रकरणाविषयी माझ्याही कानावर ‘काही’ गोष्टी आल्या आहेत. मूळ बिल गहाळ झाले तरी अन्य पर्याय असतात.राहुल शेळके, उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद