Maharashtra Rain Damage pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Rain Damage: 69 हजार शेतकर्‍यांचे नुकसान?पाथर्डीतील स्थिती

सरसकट पंचनाम्याचे विखे पाटील यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा
  • करंजी, कानोबावाडी, सासवड, देवराई, तिसगाव, जवखेडे, मांडवा या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान.

  • करंजी येथील अनेक दुकाने, घरे वाहून गेली. नदीपात्राजवळील अतिक्रमणांमुळे ही परिस्थिती ओढवली ः विखे पाटील

  • पालकमंत्र्यांना माहिती देताना अनेक शेतकरी, तरुण, महिलांना अश्रू अनावर

  • तिसगाव येथे नुकसानग्रस्त कोठ परिसर झोपडपट्टी, ऊर्दू शाळा परिसराची पालकमंत्री विखे यांच्याकडून पाहणी

पाथर्डी: यापूर्वी कधीही झाला नाही असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नूकसान झाले आहे.झालेल्या नूकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल. स्थायी आदेशा प्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.परंतू मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)

तालुक्यात रविवार (दि. 14) ते सोमवारपर्यंत दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे 69 हजार शेतकर्‍यांच्या एकूण 49 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, 26 घरांची पडझड झाली आणि 34 गायी, अडीचशेवर कोंबड्या, पन्नासेक शेळ्या 25 करडी वाहून गेल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राजू शिवाजी सोळंके (वय 39) देवळाली नदीत आणि गणपत हरिभाऊ बर्डे (वय 65) टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची दुर्घटनाही या पावसामुळे घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल मात्र तोपर्यंत नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी जास्त निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याची ग्वाहीही विखे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव, कासार पिंपळगाव यांसह अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विविध गावांना भेट देऊन विखे पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे, सायली पाटील, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाटबंधारे विभागाच्या सायली पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक नीरज राजगुरू, तहसीलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी आदी समवेत होते.

जिल्हाधिकारी व प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच निर्णय घेऊन केलेल्या उपाययोजनांमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. पण परिस्थिती पाहता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतात अजूनही पाणी असल्याने ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचेही आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त घरांना मदत किंवा घरकुल योजनेत घरे उपलब्ध करून देता येतील का, याबाबत अधिकार्‍यांनी विचार करावा. स्थलांतरित नागरिकांना फुड पॅकेटचे नियोजन करण्यात आले आहेत, असे सांगून मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राहुल राजळे, अभय आव्हाड, अक्षय कर्डिले, मोनाली राजळे, धनंजय बडे, दिगंबर भवार, संतोष शिंदे, सचिन वायकर, काशिनाथ लवांडे, विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, चारुदत्त वाघ, संदीप पठाडे, नारायण पालवे, अजय रक्ताटे, काकासाहेब शिंदे, अ‍ॅड. प्रतीक खेडकर, अरुण मिसाळ, बाळासाहेब नागरगोजे, अ‍ॅड. वैभव आंधळे, बाबा राजगुरू आदी उपस्थित होते.

दरम्यान, पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील सर्व गावांचे तत्काळ व सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे आमदार मोनिका राजळे यांचे निवेदन विखे पाटील यांना देण्यात आले.

अतिक्रमणे तातडीने काढा

विखे पाटील म्हणाले, की नदी-ओढे-नाले यांचे प्रवाह बदल्यामुळेच पाणी नागरी वस्तीत आले. या भागांत झालेली अतिक्रमणेसुद्धा नुकसानीस कारणीभूत ठरली. भविष्यात असे प्रसंग येऊ नयेत म्हणून अतिक्रमणे काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीने सुरू करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT