Baby Killed By Parents Pudhari
अहिल्यानगर

Three Month Old Baby Killed By Parents: आई-बापानेच तीन महिन्यांच्या बाळाचा गळा आवळून खून; नदीत फेकून दिला मृतदेह

संगमनेर जवळ मुळा नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाचा तपास; गुन्हे शाखेने आई, वडील आणि वाहनचालकाला अटक—दुखण्यातून सुटका मिळावी म्हणून हत्या केल्याची कबुली

पुढारी वृत्तसेवा

नगर/घारगाव: तीन महिन्यांच्या बाळाला त्याच्या आई-बापानेच गळा आवळून मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावरील कपडे काढून घेत त्यास विवस्त्र मुळा नदीपात्रात फेकून देण्यात आले. पोलिसांनी कौशल्य पणाला लावत त्या निर्दयी आई-बापाचा शोध लावला. त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकालाही पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली.

प्रकाश पंडित जाधव, कविता प्रकाश जाधव (दोघेही रा. भिवपूर, भोकरदन, जालना) आणि हरिदास गणेश राठोड (रा. आव्हाना, भोकरदन, जालना) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. संगमनेरच्या पठार भागातील घारगाव येथील नदीपात्रात 4 डिसेंबरला काटेरी झुडपात बाळाचा मृतदेह अशोक धोंडिराम माळी यांना दिसून आला. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र त्या बाळाची ओळख पटत नव्हती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक नियुक्त करत तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने घारगाव येथील घटनास्थळी भेट देत मृतदेहाची बारकाईने पाहणी केली.

त्या वेळी हा घातपात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करत करताना कौशल्य वापरले. त्या आधारे पोलिसांच्या निदर्शनास आलेली कार ही भोकरदनच्या आव्हाना येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिस पथकाने भोकरदन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा सेविकांकडून माहिती संकलित केली. त्यावेळी कविता जाधवचे नाव समोर आले. गुन्हे शाखेने जाधव दाम्पत्य आणि कारचालकाकडे चौकशी करतेवेळी त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले. पोलिसांनी ‌‘वेगळ्या मार्गा‌’चा आवलंब करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम कथन केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, महिला पोलिस भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

दुखण्यातून सुटकेसाठी आवळला गळा

मुलाचे नाव शिवांश ऊर्फ देवांश ठेवण्यात आले. जन्मापासून त्यामागे दुखणे लागले होते. तो बरा होणार नाही, याची खात्री पटल्याने आई-बापाने त्याला ठार मारण्याचा कट रचला. त्यासाठी प्रकाश आणि पत्नी कविता यांनी हरिदास राठोड यांची कार घेतली. 3 डिसेंबरला हे तिघे बाळाला घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले. घारगाव परिसरातील पुलाजवळ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधली. त्यानंतर गळा दाबून देवांशचा खून केला. अंगावरील कपडे काढून नग्नावस्थेत त्याला ब्रीजवरून नदीपात्रात काटेरी झुडपात फेकून देण्यात आल्याची कबुली निर्दयी बापाने पोलिसांना दिली.

पूर्वनियोजीत कथानकाचा भांडफोड

मृत मुलाची गावात चर्चा होऊ नये म्हणून कविताच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाल्याची अफवा नातेवाईक, गावात पसरविण्यात आली. आई कविता गावात आली तर नागरिक बाळाची विचारणा करतील, असा अंदाज बांधत बाळाला मारून टाकल्यानंतर आई कविताला देवदर्शनाला पाठविण्यात आले. मात्र पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास लावत निर्दयी आई-बापाचा भांडाफोड केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT