पाथर्डी: आषाढ महिन्यातील अमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र मढी व मायंबा येथे लाखो नाथभक्तांनी गर्दी करत कानिफनाथ महाराज व मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. आषाढी अमावस्येच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगरसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, कल्याण, तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक मढी-मायंबा येथे दाखल झाले होते.
मंगळवारी (दि. ११) रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ झाला. बुधवारी (दि. १२) दिवसभर अमावस्या असल्याने पहाटेपासूनच मढी परिसरात भाविकांची गर्दी वाढत गेली. ‘ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय’, ‘बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण तीर्थक्षेत्र दुमदुमून गेले होते.
मढी-मायंबा, मढी-घाटशिरस-वृद्धेश्वर, मढी-तिसगाव, मढी-निवडुंगे, तसेच मढी-पाथर्डी या मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पहाटेपासून वातावरणात गारवा असून, हलकासा पाऊसही सुरू होता. त्यामुळे दुचाकीवरून येणाऱ्या भाविकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र, प्रतिकूल वातावरणातही नाथभक्तांचा उत्साह आणि श्रद्धा कायम होती.
गर्दीमुळे वाहतूक विस्कळित
मढी ते मायंबा हा सुमारे सहा ते सात किलोमीटरचा मार्ग असून, या मार्गावर मोठा घाट आहे. डोंगराळ भागातून जाणारा हा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. बुधवारी वाहनांच्या अतिगर्दीमुळे हा घाट काही काळासाठी बंद पडून वाहतूक विस्कळित झाला होती. अमावस्येला या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने नाथभक्तांना वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका जाणवत आहे.
कानिफनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी दर अमावस्येला वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मढी देवस्थानतर्फे यंदा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पोलिस, देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि खासगी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी समाधी मंदिराजवळून, तसेच मंदिराच्या सभामंडपातून अशा दोन मार्गांनी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाचा लाभ घेता आला. मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, सरचिटणीस माधुरी मरकड यांच्यासह देवस्थानचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी व मुख्य अधिकारी सुशांत कवडे व कर्मचारी व्यवस्थेसाठी उपस्थित होते. मढी-मायंबाबरोबरच वृद्धेश्वर, मोहटादेवी आणि देवी धामणगाव येथील देवस्थानांमध्येही आषाढी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
मढी-निवडुंगे आणि मढी-तिसगाव या मार्गांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने अमावस्येला येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते.जिल्हा परिषदेमार्फत जनसुविधा योजनेंतर्गत मढी देवस्थान ते निवडुंगे, तसेच मढी ते तिसगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडुंगेचे माजी उपसरपंच आसाराम ससे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. दर अमावस्येला हजारो भाविक या मार्गाने दर्शनासाठी येतात. रस्त्याची दुरवस्था असल्याने भाविकांचे हाल होत असून काम तातडीने सुरू न केल्यास ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
नाथतीर्थक्षेत्राकडे येणारे रस्ते सुरक्षित करा
मढी हे राज्यातील प्रमुख नाथ तीर्थक्षेत्र असल्याने प्रत्येक अमावस्येला येथे हजारो भाविक येतात. आषाढी अमावस्येला तर लाखोंची गर्दी झाली असल्याने मढीकडे येणारे सर्व प्रमुख रस्ते सुस्थितीत असणे अत्यावश्यक आहे. विशेषतः मढी-मायंबा मार्ग डोंगराळ व घाटाचा असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षा कठडे उभारणे गरजेचे आहे. तसेच मढी-निवडुंगे आणि मढी-तिसगाव रस्त्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळूनही काम सुरू झाले नसल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. संबंधित यंत्रणांनी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.