LPG Price Hike Protest Pudhari
अहिल्यानगर

LPG Price Hike Protest: गॅस दरवाढीविरोधात श्रीगोंदा-पाथर्डीत काँग्रेसचा एल्गार

दरवाढ तात्काळ मागे घ्या व गॅस पुरवठा सुरळीत करा; तहसीलदारांना निवेदने देत आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शासनाने अचानक केलेल्या मोठ्या वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या तालुका शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असून, शासनाने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केल्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबावर त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच गॅस सिलेंडर नोंदणीचा कालावधी वाढविल्यानेही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी व तहसीलदारांना काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देऊन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक व प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष भोयटे, श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. समित बोरुडे, विकास काळे, महेश दरेकर, गोरख बायकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धनू लगड, सोहेल शेख, जितेंद्र पाटोळे, सूरज शेख, बाबासाहेब नलगे, भाऊ गावडे, योगेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शासनाने तात्काळ दरवाढ मागे न घेतल्यास पुढील काळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

पाथर्डी : गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, तसेच गॅस सिलेंडरचे वाढीव दर तातडीने कमी करा, या मागण्यांसाठी पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर आणि किशोर सानप यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष नासिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर काटे, सुनील दौंड, काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सानप, शुभम गर्जे, जुनेद पठाण, गणेश दिनकर, संपत क्षेत्रे, पापा तांबोळी, अक्षय फुंदे, मुन्ना खलीफा, नवाब शेख, सुभाष कोलते, दत्तात्रय केदार, दीपक देशमुख, शिवाजी नन्नवरे, सादिक सय्यद, आसिफ पठाण उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष नासीर शेख म्हणाले, काँग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरचा दर सुमारे चारशे रुपयांच्या आसपास होता. मात्र मोदी सरकारच्या काळात गॅस सिलेंडरचा दर 900 रुपयांपुढे गेला असून तो हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही गेल्या सात दिवसांत सुमारे दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून गरीब कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. व्यावसायिक गॅस महाग झाल्यामुळे हॉटेल व खाद्यपदार्थांचे दरही वाढले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांवर होत आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गॅसचे दर तातडीने कमी करून पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून चुली पेटवून स्वयंपाक करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT