Lohsar Bhairavnath Trust Pudhari
अहिल्यानगर

Lohsar Bhairavnath Trust Decision: लोहसरचा ऐतिहासिक निर्णय; कुस्ती हंगामा बंद, आता वाचनालय व शेती मार्गदर्शन केंद्र

युवक आणि शेतकऱ्यांसाठी नवा उपक्रम; भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा पुरोगामी निर्णय

पुढारी वृत्तसेवा

चिचोंडी शिराळ: नगर जिल्ह्यातील शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या लोहसर (खांडगाव) येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने एक अत्यंत पुरोगामी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देवस्थानने पुढील वर्षापासून यात्रेतील कुस्ती हंगामा कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कुस्ती मैदानाच्या जागी आता अत्याधुनिक वाचनालय आणि शेती मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथे युवक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रकल्प राबवले जाणार आहेत.

लोहसर यात्रा कमिटीने घेतलेल्या या निर्णयाबाबत माहिती देताना अध्यक्ष अनिल गिते पाटील यांनी सांगितले, की गावकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या बिदागीचा असा अपव्यय देवस्थानला मान्य नाही. काळाची पावले ओळखून ज्याप्रमाणे भगवानगडाने दसरा मेळावा आणि देवगडने दिंडी बंद केली, त्याच धर्तीवर लोहसरने हा निर्णय घेतला. कुस्ती हंगामाच्या जागी आता अत्याधुनिक वाचनालय आणि एमपीएससी, यूपीएससी यांसह विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय उभारले जाईल. तसेच फळबाग आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुरोगामी निर्णयांचा वारसा

लोहसर गावाने यापूर्वीही अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये देवाची दैवी सावकारकी (फंड) बंद करणे, महिलांना मंदिर प्रवेश देणे, तेल-नारळ-अगरबत्ती बंद करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. यंदाची यात्राही याच शिस्तीत पार पडली असून, कावडी मिरवणूक आणि छबीना पारंपारिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाला.

आता बैलगाडा अन्‌‍ घोडा शर्यती

कुस्तीचा कार्यक्रम बंद केला असला तरी, यात्रेच्या उत्साहात भर टाकण्यासाठी देवस्थानने तिसऱ्या दिवशी नवीन खेळांचे नियोजन केले आहे. खांडगाव येथील 53 एकर जमिनीवर बैलगाडा आणि बैल-घोडा शर्यतींचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

आम्हाला केवळ चमकोगिरी करण्यासाठी बोगस कुस्त्यांवर लाखो रुपये उधळायचे नाहीत. युवकांच्या भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या पैशाचा वापर व्हावा, हाच यामागचा उद्देश आहे.
अनिल गिते पाटील, अध्यक्ष, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, लोहसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT