Leopard  Pudhari
अहिल्यानगर

Leopard Attack: बिबट्याशी दोन हात करत शेतकरी महिलेने वाचवला जीव!

डिग्रसमध्ये शेतात जाताना बिबट्याचा अचानक हल्ला; आशा निठवे गंभीर जखमी, संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

आश्वी: डिग्रस (ता. संगमनेर) येथे बुधवारी (दि. १४) सकाळी एका शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेने बिबट्याशी मुकाबला करत स्वतःची सुटका करून घेतली. या वेळी तिच्यात जणू दुर्गाच संचारली होती. आशा संतोष निठवे (वय ३०) असे त्यांचे नाव असून, या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांच्यावर संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १४) सकाळी सुमारे सातच्या सुमारास आशा निठवे कांदा रोपांची निंदणी करण्यासाठी शेतात जात होत्या. या वेळी जवळच्या कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे त्या गांगरल्या.

मात्र, प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत त्यांनी बिबट्याशी दोन हात केले. परिणामी बिबट्या तेथून पळून गेला. या हल्ल्यात आशा यांच्या चेहऱ्यासह व शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. मात्र, परिसरात बिबट्याचा वावर आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT