कोरडगाव: कोरडगाव गावठाण परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, अधिकृत मीटरधारक नागरिकांना मोठ्या मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ती येते... डोळा मारते... आणि निघून जाते, अशी अवस्था सध्या वीजपुरवठ्याची झाल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
गावठाण हद्दीतील वीजपुरवठा कोणतेही ठोस कारण नसताना सतत खंडित होत असून, कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी तासन् तास वीजपुरवठा बंद राहतो. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य पसरत असून, चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात गावठाण परिसरात चार ते पाच ठिकाणी घरफोड्या होऊन चोरीच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. कोरडगाव गावठाणातील काही भागात फ्यूज गेल्यानंतर ते बसविणे अत्यंत धोकादायक ठरत असून, वार्ड क्रमांक दोनमधील विद्युत वाहिनीवर क्षमतेपेक्षा जास्त भार आल्यामुळे त्या भागातील वीजपुरवठा नेहमीच खंडित होत आहे.
तक्रार नेमकी कोणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांतील निष्काळजीपणामुळे ग्राहकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. अनियमित वीजपुरवठा, तसेच रानडुकरांचा त्रास यामुळे रात्री पिकांना पाणी देता येत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विद्युत अभियंता व संबंधित कर्मचारी विद्युत पुरवठ्याबाबत गांभीर्याने घेत नसून त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. विद्युत अभियंत्याकडे कोरडगाव गणाचा अतिरिक्त चार्ज असल्याने त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.
मात्र, वीजबिल भरण्यासाठी नियमितपणे फोन येत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. परिसरात वीजचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून, संबंधित कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हा प्रकार चालू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पूर्वी या ठिकाणी कार्यरत असलेले वायरमन अंबादास आव्हाड वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नेहमी सक्रिय होते. परंतु त्यांची खात्यामार्फत बदली झाल्याने नवीन वायरमन रुजू झाल्यापासून वीजपुरवठा बेभरवशाचा झाला आहे. आव्हाड यांची पुन्हा कोरडगाव येथे नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी वीज ग्राहकाकडून होत आहे.
गावातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे चोऱ्यांच्या घटनांत वाढ झाली असून, वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल.रवींद्र म्हस्के, सरपंच