Kopargaon Road Development Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Road Development: कोपरगावातील रस्ते-पुलांच्या कामांना वेग; गडकरींकडून तातडीच्या पूर्णत्वाची ग्वाही

आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे मार्गी लागणार

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांना गती मिळून वाहतुकीसाठी येणाऱ्या समस्या दूर व्हाव्या, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत मंगळवार (दि.17) रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी आमदार काळे यांनी मतदार संघातील रखडलेल्या रस्त्यांसह पुलांच्या कामांबद्दल सविस्तर माहिती देवून, समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी चर्चेदरम्यान मंत्री गडकरी यांनी, ही कामे तत्काळ मार्गी लावू, अशी ग्वाही दिली, अशी माहिती आमदार काळे यांनी दिली.

चर्चेदरम्यान, आमदार काळे यांनी, कोपरगाव मतदारसंघातील पायाभूत सुविधांवर भर दिला. मतदार संघात दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते विकासाचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. एन.एच.752 जी सावळीविहीर फाटा ते सेंधवा (मध्य प्रदेश) व एन.एच.160 सिन्नर ते शिकोडी (कर्नाटक) या दोन राष्ट्रीय महामार्गाचा यामध्ये समावेश आहे. एन.एच.752 जी राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गावरील पुणतांबा फाटा व बेट नाका येथील उड्डाणपुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करावे. पुढील वर्षी सुरु होणाऱ्या कुंभमेळा पार्श्वभूमीवर एन.एच.160 या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर फाटा- झगडे फाटा येथील उड्डाण-पुलांसह रस्त्यांचे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना द्याव्या, अशी मागणी आमदार काळे यांनी केली.

शिर्डीकडे जाणारी बहुतांश अवजड व प्रवासी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून झगडे फाटा-वडगावपान मार्गे वळवण्यात आली आहे. सततच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. भविष्यात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याप्रमाणे या रस्त्याचीही अवस्था होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या मार्गाचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे, असे आमदार काळे यांनी, मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत, रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करावा, अशी मागणी केली.

‌‘जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करावे. कोपरगाव मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून जास्त निधी मिळावा अशी मागणी केली. मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोपरगाव मतदारसंघातील रखडलेली रस्त्यांसह पुलांच्या कामांना गती मिळणार आहे.
आमदार आशुतोष काळे, कोपरगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT