

संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल््याच्या निषेधार्थ महिला, मुली, विद्यार्थी, ग्रामस्थांसह सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने बुधवारी (दि.18) कोल्हार-घोटी राज्य मार्गावर वडगाव पान फाटा येथे सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हल्लेखोर तरुणावर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनात खास करून शाळकरी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, नीलम खताळ, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ, निलेश थोरात, शरद नाना थोरात, अर्जुन काशीद, सरपंच श्रीनाथ थोरात, रूपाली थोरात, अरुण कुळधरण, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, पीडित मुलीचे नातेवाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जयश्री थोरात या वेळी म्हणाल्या, की ॲसिड हल्ल्यात पीडित मुलीचा काय दोष होता? समाज म्हणून राजकारण, पक्ष, जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून सर्वांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आले पाहिजे. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी ती प्रशासनाला दिली पाहिजे. महाविद्यालये, शाळा परिसरात आणि प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. महत्त्वाच्या गावांमध्ये पोलिसांची गस्तही सुरू केली पाहिजे.
नीलम खताळ म्हणाल्या, की भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलिस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले. वडगाव पान फाटा परिसरात सुमारे दोन ते अडीच तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे तीनही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एसएमबीटी करणार उपचाराचा खर्च
ॲसिड हल्ल्यात जखमी मुलीचा उपचारांचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे शस्त्रक्रिया किंवा डोळ्याच्या आरोग्याबाबत डॉ. जयश्री थोरात यांनी मुंबई येथील प्रथितयश डॉ. रानडे यांच्यासह विविध डॉक्टरांशी संपर्क साधला.