कोपरगाव: श्रीसाईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनदरम्यानचा सुमारे सात कोटी रुपये खर्चून तयार केलेला चौपदरी रस्ता अवघ्या अडीच-तीन वर्षातच खचल्यामुळे संतापाचा सूर आळवला जात आहे. या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महत्त्वाच्या मार्गावर ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खडी निघाल्यामुळे दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, मालट्रक, दूध टँकर वाहन चालक, नागरिकांसह विद्यार्थी, रेल्वे स्टेशनकडे जाणारे- येणारे प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
श्रीसाईबाबा कॉर्नरपासून, केबीपी विद्यालय, कोपरगाव रेल्वे स्टेशनसह, संवत्सर, देवीचे उक्कडगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर या भागांमध्ये ये-जा करण्यासाठी हा मार्ग अति महत्त्वाचा मानला जातो. सद्गुरू गंगागिर महाराज महाविद्यालय, नामदेवराव परजणे महिला महाविद्यालय, संजीवनी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन, संजीवनी युनिव्हर्सिटी, सहकारी औद्योगिक वसाहत, गोदावरी दूध संघ, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना या प्रमुख संस्थांमध्ये येणारे विद्यार्थी व कामगारांची मोठी वर्दळ या रस्त्यावरूनच सुरु असते. यामुळे या मार्गाची दुरवस्था अधिकच गंभीर ठरत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी वाहण्यासाठी बांधलेल्या गटारींचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अनेक ठिकाणी गटारी खचल्या आहेत. तडे गेले आहेत. समोर एखाद वाहन चालले की, मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. याचा दुचाकी चालकांसह पादचाऱ्यांना नाहक मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अन्नपूर्णानगर परिसरात गटारीलगत झालेल्या अपघातानंतर पडलेला खड्डा अद्याप बुजवला नाही. परिणामी येथे वारंवार अपघात होतात, अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे.
डांबरीकरण कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे किरकोळ व गंभीर अपघातांची संख्या वाढत आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी, या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात दीड दोन वर्षांपूर्वी ‘कपडे उतरवून आंदोलन’ करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुरावस्थकडे लक्ष देत नाही, असा आरोप काळे यांनी केला आहे.
संजय काळे यांनी मांडलेल्या मुद्यांनुसार, रस्ता दुभाजकावरील ब्लॉक्स काही वर्षांतच उखडले आहेत. प्रस्तावित 72 स्ट्रीट लाईट खांबांपैकी एकही खांब उभारला नाही. परिणामी रेल्वे स्टेशन परिसरासह शहराचा काही भाग अंधारातच आहे. गटारी असूनही पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळ्यात रस्त्यावरचं पाणी साठून ‘जलतरण तलाव’ तयार होतात. गटारीत पाणी जाण्यासाठी आवश्यक छिद्रे नसल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. फुटपाथचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराविरुद्ध कारवाई करुन, या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात येत आहे.
मंत्री येणार म्हणून थातूर-मातूर डागडूजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्व. अजित पवार हे सहजानंदनगर येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी या रस्त्याची थातूर-मातूर डागडूजी करून वेळ मारून नेली होती, परंतू या रस्त्यावर आत्तापर्यंत अनेक निष्पाप जणांचे बळी गेले आहेत. आता रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे की, नाही अशी संतप्त चर्चा नागरिकांमधून झडत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नावर नागरिक, विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.