कोपरगावात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Flood Alert: कोपरगावात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; गोदावरीत 41 हजार क्यूसेसक विसर्ग

गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कोपरगावः नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणांंच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडत आहे. या आशादायी पार्श्वभूमीवर नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदा पात्रात 39, 132 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

आत्तापर्यंत जायकवाडी धरणात 16 टीएमसीपेक्षा अधिक पाणी पोहोचले आहे. नाशिक जिल्ह्यात पडणार्‍या धुव्वाधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोदा पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. नदीकाठच्या गावांना पाटबंधारे व महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Latest Ahilyanagar News)

कोपरगावात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पेरणी वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दारणा व गंगापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तूर्त पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेल्या 24 तासात पडलेला पाऊस असा; मि.मि. मध्ये (कंसात एकूण पाऊस)- दारणा 42(7,18), मुकणे 57 (7,87), वाकी 62(1,127), भाम 90(1,266), भावली 1,29(1,627), वालदेवी 45 (3,66), गंगापूर 55(5,40), कश्यपी 80(6, 17), नांदूर मधमेश्वर 8(1,48), नाशिक 32(4,59), घोटी 61(1,132), इगतपूरी 90(1,578), त्र्यंबकेश्वर 70 (1,103), देवगाव 0(206), ब्राम्हणगाव 0(100),महालखेडा निरंक, कोपरगाव 0(1,31),पढेगाव 0(92), सोमठाणा 0 (75), कोळगाव 0(107), सोनेवाडी 0(70), शिर्डी 0(81), राहाता 0(79), रांजणगाव 0(68), चितळी0 (60), दारणा धरणातील पाणी पातळी 202.44 मिटर, गंगापूर 204.98, तर नांदुरमधमेश्वर बंधार्‍यात 5,33.52 मिटर एवढी आहे.

दारणा व गंगापूर धरणातून कोपरगावला पाणी पुरवठा होतो. ही धरणे आजच 60-62 टक्के भरली आहेत. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अवकाळी पावसावर ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली, त्यांच्या पिकांना पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा, दुबार पेरणीचे संकट ओढवेल, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अद्याप बर्‍याच ठिकाणी पेरणी झाली नाही. शेतकरी पावसाची वाट पहात आहेत. कोपरगाव शहराला दोन दिवसातून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांसह महिलांकडून होत आहे. शहरासह तालुक्यात सोमवारी ढगाळ हवामान होते, पावसाची रिमझिम अधुर- मधून सुरू होती.

‘जायकवाडी’त वाहिले 15 टीएमसी पाणी!

नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदी पत्रातून जायकवाडी धरणात आत्तापर्यंत 15 टीएमसीपेक्षा जास्त पाणी वाहून गेले आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून नागरिकांसह महिलांनी गोदा स्नानाची पर्वणी साधली. गोदा स्नानासाठी मोठी गर्दी दाटली होती. भाविक- भक्तांनी दिंड्या काढून शहरातील मंदिरांमध्ये दर्शनाचा लाभ घेतला.

दारणा, गंगापूर धरणे 60 टक्के भरली

दारणा 9, 932 तर, गंगापूर धरणातून 5,186 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडला आहे. नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍यातून 31, 135 क्युसेस विसर्ग झाला आहे. रात्रीतून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दारणा व गंगापूर धरणात टप्प्या-टप्प्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. दारणा व गंगापूर धरणे 60 टक्केपेक्षा अधिक भरली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT