Ashutosh Kale Kopargaon Pudhari
अहिल्यानगर

Ashutosh Kale: कोपरगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; जुगार, मटका, दारू विक्री सुरू, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

आमदार आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार; 'पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष' असल्याचा आरोप, कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा.

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी : कोपरगाव मतदार संघात पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खुले आम अवैध धंदे सुरू आहेत. गुन्हेगारी वाढून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे भावना आहे. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

आ. काळे यांनी बुधवार (दि.3) रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघासह शहरात वाढलेल्या अवैध धंद्याबाबतची माहिती दिली. यावेळी पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचीही त्यांनी तक्रार केली. अनेक गावांमध्ये खुलेआम जुगार व मटका सुरू आहे. या सर्व प्रकारांकडे स्थानिक पोलिस प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. अवैध दारू विक्री तसेच तंबाखू, गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे.

ऑनलाईन बेटिंगचे जाळेही मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. अनेक तरुण त्यात अडकत आहेत. याशिवाय भरदिवसा गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. वाढलेल्या अवैध धंद्यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला जाण्याची भीती आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून कोपरगाव मतदार संघात अवैध धंद्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता व गुन्हेगारीकडे वळत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. परिणामी शहरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्याबाबत आपण व्यक्तिश: लक्ष घालून कोपरगाव मतदार संघातील वाढलेल्या अवैध धंद्यांना लगाम बसेल, यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आ. काळे यांनी निवेदनात केली आहे.

..तर अवैध धंदे रोखण्यासाठी रस्त्यावर उतरणार!

कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून आळा बसेल, यावर आपला विश्वास राहिला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. त्यांनीही तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, निश्चितपणे अवैध धंद्यांना चाप बसेल. मात्र जर हे अवैध धंदे थांबले नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आ.आशुतोष काळे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT