Kopargaon FDA Action Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon FDA Action: कोपरगावात एफडीएची ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’; ३.६० लाखांचा गूळ-तुपाचा साठा जप्त

अयोग्य साठवणुकीमुळे कारवाई; निकृष्ट दर्जाचा संशय, गूळ व तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठविले

पुढारी वृत्तसेवा

नगर: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६’ अंतर्गत कोपरगाव तालुक्यात दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ३.६० लाख रुपये किमतीचा गूळ व तुपाचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त एम. यू. माने आणि अन्न विभागाच्या सहाय्यक आयुक्त ए. ए. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोपरगाव येथील मे. कांतिलाल हरलाल जोशी यांच्या आस्थापनेवर पहिली कारवाई करण्यात आली.

या वेळी २१४९ किलो गूळ आढळून आला. त्याची एकूण किंमत १ लाख १८ हजार १९५ रुपये आहे. या गुळाची साठवणूक अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार निर्धारित पद्धतीने नसल्याचे आढळून आले. तसेच हा गूळ निकृष्ट दर्जाचा असण्याचा संशय असल्याने त्याचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला.

२५० किलो तुपाचा साठा जप्त

दुसरी कारवाई मे. माजी आमदार के. बी. रोहमारे दूध शीतकरण, पोहेगाव येथे करण्यात आली. या ठिकाणी गायीचे तूप १४९ किलो, तसेच सुटे तूप ९९ किलो, असा एकूण तुपाचा साठा आढळून आला. या साठ्याची एकूण किंमत २ लाख ११ हजार १४० रुपये आहे. तुपाची साठवणूक अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार योग्य पद्धतीने नसल्याचे आढळले.

तसेच तूप निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाया अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) ए. ए. भोईटे यांच्या समवेत केली. दरम्यान, जप्त केलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT