कोपरगाव: काही व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेवून, जादा भावाचे आमिष दाखवित, आर्द्रता मशिनमध्ये हातचलाखी करून, वाळलेली सोयाबीन, मकाची आर्द्रता जास्त तर, प्रतवारी कमी आहे, असे भासवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी शेत शेतमाल थेट कोपरगाव बाजार समितीच्या मुख्य आवारातचं विक्रीस आणावा. येथे उघड लिलावातील शेतमाल विक्रीतून योग्य दर मिळतो. फसवणुकीपासून संरक्षण होते, असे कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
उप सभापती गोवर्धन परजणे म्हणाले की, बाजार समितीत हमाली, तोलाई वगळता शेतकऱ्यांच्या काटा पट्टीत कपात केली जात नाही. लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. पैशाची हमी दिली जाते.
यंदा अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यातील सोयाबीन व मका पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मजुरी देण्यासह रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैशाची गरज आहे. या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत, काही व्यापारी आर्द्रता मीटरमध्ये तांत्रिक बिघाड दाखवून शेतकऱ्यांना गंडा घालतात. शेतकऱ्यांनी हितासाठी बाजार समिती आवारातच भुसार, सोयाबीन विक्रीस आणावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव एन. एस. रणशूर व संचालक मंडळाने केले आहे.
दरम्यान, शेतमाल विकताना शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडून हिशोब पट्टी प्रत घ्यावी. शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी ती आवश्यक असते, असे आवाहन कोपरगाव बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
फिरत्या पथकाची करडी नजर
काही खासगी व्यापारी इलेक्ट्रॉनिक काट्यात ‘डजेस्टमेंट’ करून वजनात 2 ते 5 किलोपर्यंत फरक दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करतात, यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव बाजार समितीने फिरते पथक तयार केले आहे. या पथकाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करडी नजर आहे. अशा व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे.