कोपरगाव : तालुक्यातील शेत-शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी, थेट बांधावर जाऊन न्यायनिवाडा मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाच्या गतिमान कारभारामुळे आत्तापर्यंत तब्बल 75 क्लिष्ट प्रकरणे निकाली निघाली आहेत. 60 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते मोकळे झाले आहेत. हिंगणी येथील पारधी वस्तीचा 14 वर्षांपासून प्रलंबित वाद सामंजस्याने मिटवून या मोहीमेने यशस्वी 75 वा टप्पा पूर्ण केला आहे. ‘बांधावरचं न्यायनिवाडा कोपरगाव पॅटर्न’ राज्यात नावारूपाला येत आहे.
उक्कडगाव येथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 49 अन्वये रस्ता व पाईपलाईनचा वाद महसूलने जागेवरचं मिटवून 4 कुटुंबियांना दिलासा दिला. मौजे ब्राह्मणगाव टाकळी येथील देवकर वस्तीवरील 5 कुटुंबियांचा रस्ता प्रश्न मिटवून 27 व्यक्तींची वहिवाट सुलभ केली. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाव, वेस, ओगदी, पढेगाव, मळेगावथडी, रवंदे, धोडेंवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, जऊर पाटोदा, धारणागाव, देर्डे चांदवड, आपेगाव, येसगाव, कोळपेवाडी, कुंभारी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, काकडी, सोनेवाडी, मल्हारवाडी, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, जवळके, तळेगांव मळे, वेळापूर, हंडेवाडी, धोंडेवाडी, सडे,
मनेगावसह आता ब्राह्मणगाव टाकळी, उक्कडगाव, संवत्सर व हिंगणी या गावांचा समावेश झाला आहे. तहसीलदार रात्री उशीरापर्यंत वस्तीवर कोपरगाव तालुक्यातील हिंगणी - पारधी वस्तीवरील शेतरस्त्याचा वाद 2010 सालापासून प्रलंबित होता. रस्त्याअभावी पारधी वस्तीतील तब्बल दीडशे लोकांना रहदारीसाठी अडचण निर्माण झाली होती. कित्येकदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर तहसीलदार महेश सावंत यांनी, रात्री 8.45 वाजेपर्यंत या वस्तीवर थांबून, सर्वांना समजावले. अखेर ‘बांधावरचं न्याय निवाडा’ करून 10 फूट रुंद- 1600 फूट लांबीचा रस्ता सामंजस्यातून उपलब्ध करून दिला.
‘शेतजमीन विभाजन-हस्तांतरणामुळे रस्त्यांवरील वाद वाढले आहेत. प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देणे, हा शासनाचा उद्देश आहे. तहसीलदार महेश सावंत यांनी, आत्तापर्यंत 75 प्रकरणे बांधावरचं सामोपचाराने निकाली काढली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचला आहे.माणिक आहेर, उपविभागीय अधिकारी, शिर्डी
‘प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला पाहिजे, असा शासनाचा संकल्प आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बांधावरचं न्यायनिवाडा’ उपक्रम राबविला. संवत्सर व हिंगणीगावातील पारधी वस्तीसारख्या क्लिष्ट प्रकरण हताळण्यात यश आले. वाद सामंजस्याने मिटल्यामुळे गावकऱ्यांत जय-पराजयाची भावना उरली नाही, हेच या उपक्रमाचे यश आहे.महेश सावंत, तहसीलदार, कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील मौजे संवत्सर येथील जाधव वस्तीवर रेल्वे विभाग व शेती महामंडळ यांच्या हद्दीमुळे गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला होता. तहसीलदार महेश सावंत यांनी, ही समस्या सोडवून, तब्बल 185 एकर शेतीसाठी रस्ता खुला केला.