Harassment Pudhari
अहिल्यानगर

Kolpewadi Girl Students Harassment: विद्यार्थिनींची छेडछाड; कोळपेवाडीत रोडरोमिओंचा उच्छाद

स्टंटबाजी, पाठलाग वाढला; पोलिसांची दखल नसल्याने पालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: कोळपेवाडी परीसरात अनेक शाळा, महाविद्यालय आहेत. कॉलेज रोड आणि बसस्थानक परिसरात रोडरोमिओंनी मोठा उच्छाद घातला आहे. दुचाकीवरून भन्नाट वेगाने स्टंट करताना व विद्यार्थिनींचा पाठलाग करताना दिसत असून विद्यार्थीनींची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्दैवाने पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने सुरेगाव-कोळपेवाडीच्या पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी परिसरात रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, डॉ.कोळपे नॉलेज सिटीचे मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेज, चांगदेव बारकू पा.कोळपे माध्यमिक विद्यालय अशी अनेक शाळा महाविद्यालय आहेत.

त्यामुळे कोळपेवाडी-सुरेगाव परिसरात शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनी सायकल, पायी किंवा बस स्टॉपकडे जात असताना त्यांच्या मागे दुचाकीवर मोठ्या आवाजात हॉर्न वाजवून अनेक रोडरोमिओ पाठलाग करतात.

याबाबत अनेकवेळा शाळा, महाविद्यालय प्रशासनाने कोपरगाव पोलिस स्टेशनला लेखी पत्र दिले. परंतु पोलिस प्रशासनाने त्या पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे सात वर्षांपुर्वी घडलेल्या ‌‘त्या‌’ घटनेची पोलिस पुन्हा वाट पाहत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अवैध धंद्यांतून गुन्हेगारी वाढली

पोलिस प्रशासनाने प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात नियमितपणे भेट देऊन या संदर्भात स्वतंत्र लेखी स्वरुपात माहिती ठेवण्यात यावी. जेणेकरून शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या रोड रोमियोवर वचक राहून विद्यार्थिनीमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. परंतु मागील काही वर्षापासून शाळा महाविद्यालयांकडे पोलिसांनी एकदाही ढुंकून न पाहिल्यामुळे रोड रोमिओंचे फावल्याचे दिसत आहे. पोलिसांचे अवैध धंद्यांना मिळणारे बळ, त्यातून वाढत असलेली गुन्हेगारी, यामुळे गुन्ह्याचा आलेख वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT