कोल्हारः कोल्हार- हनुमंतगाव व पाथरेसह पंचक्रोशीतील गावांमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करा. कोणालाही पाठीशी न घालता ओढे, नाल्यांवरील अतिक्रमण महिन्यात हटवा, अशा सूचना जलसंपदा तथा, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.
पावसामुळे कोल्हार भगवतीपूरसह पाथरे, हनुमंत,गाव या भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याची वाट अतिक्रमित झाल्यामुळे सर्व पाणी शेतात शिरले. याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. (Latest Ahilyanagar News)
या पार्श्वभूमीवर पालक मंत्री विखे पाटील यांनी, पावसामुळे झालेल्या नुकसानीची वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी, प्रमुख पदाधिकारी, महसूल, कृषी, जलसंपदा व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रातांधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम अभियंता श्रीनिवास वर्पे, जलसंपदाचे स्वप्निल काळे आदी अधिकारी व गावांमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रामुख्याने ओढे- नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळेचं शेतात पाणी शिरले आहे, अशी गंभीर बाब निदर्शनास आली आहे. महसूल व जलसंपदा विभागाने एकत्रितपणे पाहाणी करून तातडीने ओढे- नाले अतिक्रमणमुक्त करावेत, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या. यासाठी मोजणी करण्याची वेळ आलीतरी, तशी कार्यवाही करा. अतिक्रमण कोणाचेही असो, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले.
अनाधिकृत प्लॉट विक्री झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात बैठकीत करण्यात आल्या. या व्यवहारांची पुर्णर तपासणी करावी. कोल्हार व लोणी खुर्द येथील प्लॉटचे व्यवहार करताना नियमाप्रमाणे सर्व तरतूदी केल्या आहेत किंवा नाही, याची माहिती घेवून, व्यवहार करण्याबाबत प्रांताधिकारी व तहसिलदारांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.
सरसकट पंचनामे करा
कृषी विभागाने सरसकट पंचनामे करावेत. ई पिक पहाणी मर्यादा लक्षात घ्या. पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश पालक मंत्री विखे पाटील यांनी कृषि अधिकाऱ्यांना दिले. वन विभागाने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी अधिक उपाय- योजना कराव्या.
पिंजऱ्यांची मागणी वाढत असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करा. निधी उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. पशुसंवर्धनने लम्पि साथ रोगाबाबत गांभीर्याने उपाययोजना करा, असे निर्देश त्यांनी दिले