Satbara Pudhari
अहिल्यानगर

Khed Land Map Errors: सातबारा आपला, पण ऑनलाइन नकाशावर गट दुसऱ्याच शेतात!

खेड परिसरातील शेतकरी त्रस्त; पीक पाहणी, जिओटॅगिंग, अनुदान आणि बँक कर्जांमध्ये अडथळे, ऑनलाइन नकाशे दुरुस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खेड: शेत आपले... सातबारा आपला... मात्र ऑनलाइन नकाशावर गट दुसऱ्याच शेतात! कर्जत तालुक्यातील खेड परिसरात ऑनलाइन जमीन नकाशांमधील विसंगतीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सुरू असलेल्या पीक पाहणीसह जिओटॅगिंग, कृषी योजनांचे अनुदान, जमीन व्यवहार आणि बँक कर्ज प्रकरणांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे.

प्रत्यक्ष शेतातील गट क्रमांक आणि ऑनलाइन नकाशावरील गट जुळत नसल्याने पीक नोंदणी करताना अडथळे येत आहेत. केळी, फळबाग, पोल्ट्री यांसह विविध योजनांसाठी जिओटॅगिंग करतानाही प्रत्यक्ष क्षेत्र दुसऱ्याच गटात दिसत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित योजनांचा लाभ आणि अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पूर्वी खेड हे एकच महसुली गाव होते.

सुमारे एक हजार ते बाराशे सर्व्हे क्रमांक असलेल्या या गावाची पुढे खेड, गणेशवाडी, औटेवाडी, वायसेवाडी आदी गावांमध्ये विभागणी झाली. त्यानंतर गट स्कीम लागू होऊन सर्व्हे क्रमांकांचे गट क्रमांक झाले. पुढील विभाजनांमुळे नोंदीही बदलल्या. मात्र, या बदलांचा अचूक ताळमेळ ऑनलाइन नकाशांमध्ये झालेला नसल्याने अनेक ठिकाणी जुन्या सर्व्हे क्रमांकांचे नकाशे दिसत आहेत. परिणामी सध्याचे गट आणि प्रत्यक्ष क्षेत्र यामध्ये विसंगती निर्माण झाली आहे.

या नकाशांच्या घोळाचा परिणाम जमीन मोजणी, हद्दीचे वाद, ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहार, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या कृषी कर्ज प्रकरणांवरही होत आहे. नकाशातील तफावतीमुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे असूनही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत कर्जतचे तत्कालीन तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, भूमी अभिलेख कार्यालयाकडून अद्याप ठोस दुरुस्ती झालेली नसल्याने प्रश्न कायम आहे.

भूमी अभिलेख विभागाने खेड, गणेशवाडी, औटेवाडी, वायसेवाडी आदी गावांचे पुनःसर्वेक्षण करून जुने सर्व्हे क्रमांक, सध्याचे गट, सात-बारा आणि प्रत्यक्ष क्षेत्र यांचा ताळमेळ घालावा व ऑनलाइन नकाशे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नकाशातील चूक ही केवळ तांत्रिक बाब नसून शेतकऱ्यांच्या पीक नोंदणी, अनुदान, कर्ज आणि जमीन व्यवहारांवर परिणाम करणारा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने विलंब न करता हा घोळ कायमचा मिटवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT