नगर : जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 760 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 29 हजार 94 हेक्टर उडदाचा समावेश आहे. सोयाबीन व कापसाचा पेरा देखील वाढला आहे. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत 18 टक्के पेरा झाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी 6 लाख 93 हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार सोयाबीनसाठी पावणेदोन लाख तर कापसासाठी जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र असणार आहे. मे महिन्यात तसेच गेल्या काही दिवसांत सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागत रखडली होती. पावसाचे विश्रांती घेतल्याने पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.
जिल्ह्यात 17 जूनपर्यंत भात पेरणीस अद्याप प्रारंभ झालेला नाही. सध्या उडीद पिकाने आघाडी घेतली आहे. 54 हजार 337 हेक्टरपैकी 53 टक्के हेक्टरवर पेरणी झाली. बाजरी पिकासाठी 98 हजार 529 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. आतापर्यंत सध्या बाजरीची पेरणी 10 हजार 150 हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात 1 लाख 86 हजार 167 हेक्टरवर गळीतधान्याची पेरणी अपेक्षित आहे. मात्र, तीळ, कारळे व सूर्यफूल आदींच्या पेरणीस प्रारंभ झालेला नाही. भुईमुगाची पेरणी 178 हेक्टरवर झाली. सोयाबीनची मात्र 23 हजार 675 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
कापसाचा पेरा 14 टक्के म्हणजे 21 हजार 369 हेक्टरवर झाला आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत 23 टक्के म्हणजे 12 हजार 288 हेक्टरवर तूर, 34 टक्के म्हणजे 18 हजार 335 हेक्टरवर मुगाची तर 53 टक्के उडदाचा पेरा झाला आहे.
जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता व इतर तालुक्यांत मे महिन्याच्या तिसर्या व चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसावरच काही शेतकर्यांनी कापसासह इतर पिकांची पेरणी केली आहे. या पिकांना पावसाची आवश्यकता आहे. पावसाने दडी मारली आहे. याशिवाय वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे कपाशीला पाणी मिळणे अवघड झाले.