Rohit Pawar: आता कर्जतच्या क्रीडा संकुलाची जागा बदलण्याचा घाट; आ. रोहित पवार यांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट

आ. रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत जागा न बदलता प्रलंबित असलेली फाईल मंजूर करण्याची मागणी केली
Ahilyanagar news
रोहित पवार यांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेटpudhari
Published on
Updated on

कर्जत : महसूल मंत्रालयात क्रीडा संकुलाच्या अंतिम मान्यतेची फाईल प्रलंबित असताना ती मंजूर करण्याऐवजी आता क्रीडा संकुलासाठीची जागाच बदलण्याचा घाट सत्ताधारी आमदारांनी चालविला आहे. आ. रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत जागा न बदलता प्रलंबित असलेली फाईल मंजूर करण्याची मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून कर्जतमधील अनेक कामांमध्ये राजकारण रंगतदार होत असल्याचे पदोपदी दिसून आले आहे. तालुक्यातील रस्ते, शासकीय इमारतीसह विविध विकास कामांसाठी आ. रोहित पवार प्रयत्नशील आहेत. आ. पवार यांनीच कर्जतला क्रीडा संकुल मंजूरीसाठी प्रयत्न केले. त्याला यश मिळत असतानाच आता पुन्हा एकदा राजकीय रंग त्यात भरले गेले आहे.

कर्जतला क्रीडा संकुल उभारणीसाठी 6.3 कोटी रुपयांना मंजुरी आ. पवार यांनी आणल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. क्रीडा संकुलासाठी योग्य आणि पुरेशी असलेली बर्गेवाडीची जागा मिळण्यासाठी 2022 पासून आ. पवार पाठपुरावा करत आहे. तालुका क्रीडा समितीने जिल्हाधिकार्‍यांना या जागेचा प्रस्ताव दिला. जिल्हाधिकार्‍यांकडून तो विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला. विभागीय आयुक्तांनी तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला. मंत्रालय स्तरावर या प्रस्तावाला क्रीडा, वित्त व नियोजन या तिन्ही विभागाने मंजुरी दिली. आता अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेला, परंतु त्यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आता विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित असून तो प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याकडे केली. त्यासाठी आ. पवार यांनी मंगळवारी मंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेत चर्चा केली.

दरम्यान, एकीकडे आमदार रोहित पवार यांचा कर्जत क्रीडा संकुलाच्या जागेसाठी पाठपुरावा सुरू असताना दुसरीकडे सत्तापक्षातील आमदारांनी मात्र क्रीडा संकुलासाठीची जागा बदलण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे करत त्यासंदर्भात बैठकही आयोजित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय ओढाताणीत मात्र क्रीडा संकुलासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी आ. रोहित पवार यांनी केली होती. परंतु त्यावेळी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही. आता जागा बदलण्याची मागणी सत्ताधारी आमदारांकडून होत असेेल तर एमआयडीसी सारखी स्थिती होवू नये म्हणजे झालं, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news