नगर: केडगावचे नेते भानुदास कोतकर समर्थकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्याने केडगाव भाजप निष्ठावंतांनी कोतकरांविरोधात कंबर कसली आहे. उमेदवारी देताना निष्ठावंतांना न्याय मिळावा, यासाठी ते शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांना भेटले. त्यानंतर त्यांनी भूमिका जाहीर केल्याने तर्कविर्तकांना उधान आले आहे.
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. केडगावातील भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर हे निष्ठावंत शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या भेटीसाठी पोहचले. भेटीनंतर निष्ठावंतांनी पुन्हा बैठक घेतली. या बैठकीत प्रभाग 15,16 आणि 17 मधून जुने व नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधावा. जुन्या कार्यकर्त्यांना किमान 50 टक्के जागा द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षापासून निष्ठेने काम करताना केडगावात भाजप मोठी केली. आता महापालिका निवडणुकीत न्याय मिळावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जुन्या अनुभवी कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली तर पक्ष संघटन मजबूत होण्यास लाभ हाईल. जुन्यांना उमेदवारी दिली तर भविष्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वात भाजप बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मिळालेले मताधिक्य हे भाजपच्या निष्ठावंतांच्या प्रमाणिकपणामुळेच. आता कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून महापालिकेकडे पाहिले जाते, त्यात जुन्या निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. केडगावातील उमेदवार निश्चित करताना जुन्या निष्ठावंतांना विश्वासात न घेतल्यास भविष्यात भाजप पक्ष संघटन वाढीसाठी गृहीत धरू नये, असा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला. निष्ठावंत जुन्या भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीचा पालकमंत्री विखे पाटील विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. केडगाव मंडलाध्यक्ष भरत ठुबे, शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव विधाते, माजी उपाध्यक्ष धनंजय जामगावकर, माजी मंडलाध्यक्ष पंकज जाहागिरदार, माजी मंडलाध्यक्ष शरद ठुबे, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, विजय गायकवाड, मंगेश खंगले, प्रमोद कुलकर्णी, संध्या पावसे, युवा मोर्चाचे अजित कोतकर, उमेश ठोंबरे, अक्षय विरकर, शुभम लोंढे, ऋषिकेश मिसाळ, विशाल कर्डिले, मिलिंद भालसिंग बैठकीला उपस्थित होते.
महायुती म्हणूनच महापालिकेला निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेने घेतला असून त्यादृष्टीने जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सावेडीतील 6 आणि 7 नंबरमधील सगळ्याचा जागा भाजपला तर 1 आणि 14 नंबर वार्डातील सर्व जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज मंगळवारपासून सुरूवात होत आहे. त्यापूर्वीच महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करत आहेत. तिन्ही पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आता उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यापूर्वी जागा वाटप होणे अपेक्षित असले तरी जागा वाटपाचा ‘खेळ’ अखेरपर्यंत रंगणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान गत पंचवार्षिक निवडणुकीला सर्व जागा जिंकणारे राष्ट्रवादी आणि भाजप चार वार्डात कोणताही समझोता करणार नाहीत. या चारही वार्डातील सगळ्याच जागा जो तो पक्ष लढणार आहे. हाच फॉर्म्युला शिवसेनेसाठी 15 नंबर प्रभागासाठी लागू होणार का? याची उत्सुकता आहे. 15 नंबर वार्डासंदर्भात अजून चर्चाच सुरू असल्याचे समजते. एकीकडे शिवसेनेशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी व भाजपने प्रत्येकी आठ उमेदवारांना ‘कामाला लागण्याचे’ आदेश दिले आहेत. दोन दिवसापासून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे.
महाआघाडीचा ‘मेरिट’ फॉर्म्युला
खासदार नीलेश लंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादीचे (शप) जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांच्यात रविवारी रात्री जागावाटपावर बराच खल झाला. मात्र फॉर्म्युला ठरला नाही. विजयाची क्षमता असलेला उमेदवार असेल त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा निर्णय झाला. म्हणजे मेरिटनुसार महाविकास आघाडीचे जागा वाटप होईल, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वाधिकार काँग्रेसने स्थानिक पातळीवर दिले आहेत. तिन्ही पक्षाचे एकमत होत नाही, अशा जागावर प्रदेश पातळीवरून तोडगा काढला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसची गुरुवारी मुंबईत बैठक
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतल्या. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केलेली उमेदवारांची यादी प्रदेश समितीकडे पाठविली जाणार असून गुरुवारी (दि.25) त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, आ. हेमंत ओगले, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर उपस्थित होते. मुलाखतीनंतर ज्यांना उमेदवारांच्या नावाची शिफारस शहर जिल्हा समिती करणार आहे. शहरजिल्हा समितीने दिलेल्या नावावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुबंईत होणाऱ्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहे.