पारनेर: भूमीअभिलेखमध्ये असणाऱ्या मोजणी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्रिकरण मोजणी प्रकरणे हदनिश्चित आदी प्रकरणे अनेक वर्ष प्रलंबित आहेत. त्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करू नका. त्यांना मोजणीसाठी तारखा न देता अधिकारी मोजणीसाठी तातडीने पाठवा, अशा सूचना आमदार काशिनाथ दाते यांनी केल्या आहेत.
तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी आमदार दाते यांनी भूमी अभिलेख अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यामध्ये तालुक्यातील 2233 मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील 713 प्रकरणांना तारीख दिली, 1320 शिल्लक मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत.
कार्यालयात नियमित कर्मचाऱ्यांची संख्या 8 असून, खासगी व इतर एजन्सीकडून नियुक्त असे एकूण 30 कर्मचारी आहेत. त्यांच्या माध्यमातून तातडीने प्रलंबित असणारे प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीत शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना मोजणीच्या तारखा अद्याप मिळाल्या नाहीत. त्यांना तारखा देऊ, त्यांच्या हद्दी दाखवाव्यात, नव्याने 30 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. एकत्रीकरणाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येईल. कमी कर्मचारी संख्येमुळे मोजणी प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचे उपअधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे यांनी सांगितले.
यावेळी शिररस्तेदार विजय हरिश्चंद्रे, परीक्षण भूमापक प्रशांत शिंदे, कनिष्ठ लिपीक दुर्गेश सोनार आदी उपस्थित होते.
भूमिअभिलेखमध्ये प्रलंबित मोजणी प्रकरणासाठी अधिकाऱ्यांना तातडीने ते प्रकरणी निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या मोजण्या राहिल्या असल्यास त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात येईल.-आमदार काशिनाथ दाते