Sewing Machine Pudhari
अहिल्यानगर

Karjat Sewing Machine Scam: कर्जतमध्ये शिलाई मशिन घोटाळा; 439 महिलांची 4.82 लाखांची फसवणूक

स्वयंरोजगाराच्या आमिषाने पैसे उकळले; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून तालुक्यातील तब्बल 439 बचत गटातील महिलांची 4 लाख 82 हजार 900 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली प्रत्येकीकडून 1100 रुपये उकळण्यात आले, मात्र एकाही महिलेला मशिन मिळाले नाही.

या प्रकरणी पंचायत समितीच्या सी.आर.पी. सरोज सुभाष सुतार (रा. राशीन) यांनी थेट कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. सरोज सुतार या 2019 पासून सी.आर.पी. म्हणून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देतात. याच विश्वासाचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ (रा. कोरेगाव) याने त्यांच्याशी संपर्क साधला.

‌‘7500 रुपयांत दोन शिलाई मशिन देतो. सध्या फक्त 1100 रुपये बुकिंगसाठी भरा,‌’ असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. यानंतर सुतार व इतर महिलांनी तालुक्यातील 439 गरजू महिलांकडून पैसे गोळा करून एकूण 4 लाख 82 हजार 900 रुपये अडसूळकडे सुपूर्द केले.

पैसे भरून अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशिन मिळाले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ केली जात असून फोनही उचलला जात नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटताच सरोज सुतार कर्जत पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.

‌‘गरीब महिलांच्या तोंडचा घास पळवला‌’

बचत गटातील महिला अत्यंत कष्टाने पैसे साठवतात. शिलाई मशिनमुळे उत्पन्न मिळेल या आशेवर अनेक महिलांनी उसने-पासने करून 1100 रुपये भरले होते. शासकीय योजनेचा बुरखा पांघरून गरीब महिलांची फसवणूक करण्यात आली. हा सरळ विश्वासघात आहे. आरोपीला तात्काळ अटक करून पैसे परत मिळवून द्यावेत,‌’ अशी मागणी महिलांनी केली आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, तसेच महिलांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. तपासात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बचत गटांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT