

नेवासा: सतत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन संजय सुखदान यांनी माझ्यावर गावठी पिस्तुलातून (कट्टा) गोळ्या झाडत हल्ला केल्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नेवासा नगरपंचायती मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी केला असून, त्याबाबत त्यांनी अहिल्यानगर येथे तोफखाना पोलिस ठाण्यात सुखदान यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नेवाशात यामुळे खळबळ उडाली आहे.
मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास माझ्या चारचाकी वाहनात (एमएच 12 व्हीव्ही 7213) बसून जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी जात होतो. त्या वेळी तेथे संजय लक्ष्मण सुखधान याने त्याच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकलने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या चारचाकी गाडीवर जोराची धडक दिली. त्यामुळे मी घाबरून तेथून गाडीमध्ये बसून नेवासा फाट्याकडे जात होतो.
तेव्हा शहरातील खोलेश्वर मंदिराच्या चौकाच्या पुढे आलो असता तेथे संजय सुखधान त्याच्या बुलेट मोटारसायकलवरून जोरात आला व त्याची बुलेट मोटारसायकल माझ्या चारचाकी गाडीला आडवी लावली. मी गाडीच्या खाली उतरलो असता सुखधान याने त्याच्या कमरेला हात घालून गावठी कट्ट्यातून माझ्या दिशेने ‘फायर’ केले. म्हणून मी पटकन खाली वाकलो. त्यामुळे मला गोळी लागली नाही. त्याच वेळी संजय सुखधान याने दुसरा फायर केला असता त्याच्या गावठी कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने फायर झाला नाही, म्हणून मी वाचलो व घाबरून तेथून गाडीमध्ये बसून निघून गेलो. तसेच मी नेवासा नगरपंचायतीमध्ये शासकीय कर्तव्य पार पाडत असताना सुखधानने तेथे येऊन मला अर्वाच्य भाषेत शिवागीळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व मी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.
गोळीबार झाला व आपण घाबरून निघून गेलो होतो. संजय सुखदान हा गुंडप्रवृती व खुनशी असल्याने तक्रार दिली नव्हती; परंतु अजून त्याचे साथीदार माझा पाठलाग करीत असल्याने तोफखाना पोलिस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली, असे फराटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. फराटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय सुखदानविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचाआज मोर्चा
नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर सूडभावनेतून ॲड. संजय सुखधान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, नेवासा शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता नेवासा पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनास निवेदन देण्यात येणार असून, संबंधितांवर निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
या निषेधाला पाठिंबा दर्शवत स्वतःहून नेवासा शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सर्वपक्षीयांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.