

नगर: जिल्ह्यात 20 ते 23 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून काही तालुक्यांत तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस नोंद झाला.
हवामान खात्याने आगामी चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली. पहिल्या तीन दिवशी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असून, 30 ते 40 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा वाहणार आहे. 23 एप्रिल रोजी जोरदार पावसाची शक्यतादेखील व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.
शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.