कर्जत: आठवडे बाजारच्या दिवशी कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे वाहनचालक, व्यापारी, तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कर्जत शहरात सोमवार हा आठवडे बाजारचा दिवस असून, या दिवशी मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. याच दरम्यान ऊस वाहतुूकीचे ट्रक व दोन ट्रॉली असलेले ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात शहरातून ये-जा करीत असल्याने वाहतुकीचा कोंडमारा सातत्याने होत आहे. मुख्य रस्त्यावरून एकापाठोपाठ एक जाणारी ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने ही वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहेत.
त्यामुळे काही वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची स्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर आठवडे बाजारच्या दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर शहरात प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली वाहनेही वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. ऊस वाहणारे डबल ट्रॉली ट्रॅक्टर, ट्रक, तसेच रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने यावर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह व्यापारी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून कर्जत शहराला वाहतूक कोंडीमधून मुक्त करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.