कर्जत: शहरात मंगळवारी रात्री आणि बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात झालेल्या या जोरदार पावसाने शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि चौकात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मकरसंक्रांतीला पाऊस पडल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी संध्याकाळनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि रात्री 10 नंतर अचानक काही वेळेतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागरिक, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांना नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आंब्याचा मोहर या पावसामुळे गळाला.
हवामानावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. गव्हाला काही प्रमाणात हा पाऊस लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे. फळबागांना मात्र या पावसामुळे नुकसानीचा फटका बसला आहे. रब्बी पिके सध्या फुलोऱ्यात आहेत. काही भागांमध्ये ज्वारी दाणे भरण्याच्या स्थितीत आहेत. हरभरा पिकावर ढगाळ हवामानामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.