Karjat Nagar Panchayat Pudhari
अहिल्यानगर

Karjat Nagar Panchayat No Confidence Motion: कर्जत नगरपंचायतीत पुन्हा राजकीय भूकंप; उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव

राम शिंदे-रोहित पवार समर्थक पुन्हा एकत्र; १५ जुलैच्या विशेष सभेत सत्तासमीकरणावर लागणार शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत नगरपंचायतीतील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नगराध्यक्ष रोहिणी घुले यांना पदावरून हटविण्यासाठी एकत्र आलेले राम शिंदे आणि रोहित पवार समर्थक नगरसेवक आता उपनगराध्यक्ष संतोष सोपान मेहत्रे यांच्याविरोधातही आक्रमक झाले असून, त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून, १५ जुलै रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेचच गटनेते प्रा. सतीश पाटील यांनी उपनगराध्यक्षवरील अविश्वासाचे पत्र नगराध्यक्ष छाया शेलार यांच्याकडे दिले.

प्रा. पाटील यांच्या पुढाकाराने तब्बल १३ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. नगराध्यक्षा छाया सुनील शेलार यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यात उपनगराध्यक्षांनी एकाधिकारशाही पद्धतीने कारभार केल्याचा, विकासकामांमध्ये दुजाभाव केल्याचा आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रस्तावाची दखल घेत नगराध्यक्ष छाया शेलार यांनी १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलावली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील तरतुदीनुसार होणाऱ्या या सभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार असून, सभेचे कामकाज नगराध्यक्ष स्वतः पीठासीन अधिकारी म्हणून पाहणार आहेत.

राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा ही राम शिंदे आणि रोहित पवार समर्थक नगरसेवक पुन्हा एकत्र आल्याची आहे. रोहिणी घुले यांच्या राजकीय अध्यायानंतर आता संतोष मेहत्रे यांच्या पदालाही मोठे आव्हान निर्माण झाले असून, नगरपंचायतीतील सत्तेची पुनर्रचना करण्यासाठी वेगवान राजकीय डावपेच आखले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

१५ जुलैच्या विशेष सभेत आवश्यक बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना पद गमवावे लागणार आहे. त्यामुळे ही सभा केवळ एका पदाचा निर्णय घेणारी नसून, कर्जत नगरपंचायतीतील पुढील सत्तासमीकरणाची दिशा ठरविणारी ठरणार आहे. पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या निर्णायक सभेकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT