

नगर /नगर तालुका: श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती व अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजारातील सर्व व्यवहार रविवार, दि. १२ जुलै आणि सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भातील आदेश बाजार समितीच्या सचिवांनी जारी केले असून व्यापारी, आडते, भाजीपाला व फळफळावळ व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असून शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) या दोन दिवसांसाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुक्काम करणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि. १३) रोजी पालखी पुढील प्रवासाला रवाना होणार आहे.
दिंडीत सुमारे ५० हजार वारकरी सहभागी होणार असल्याने त्यांच्या भोजन, निवास आणि इतर सेवा-सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी माथाडी कामगारांची आवश्यकता भासणार असल्याने तसेच बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारीही सेवाकार्यात सहभागी होणार असल्यामुळे नेप्ती उपबाजार दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला, फळफळावळ आणि इतर कृषी मालाचे व्यापारी, आडते, शेतकरी व संबंधित घटकांनी या निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान मंगळवार (दि. १४) पासून नेप्ती उपबाजारातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी सेवेला प्राधान्य देत बाजार समिती प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. महापालिकेच्या वतीने सुलभ शौचालय, आरोग्य सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.