कर्जत: कर्जत येथील न्यायालयाच्या इमारतीवर अतिरिक्त मजला बांधण्यात येणार असून, न्यायाधीशांसाठी नवीन न्यायालयीन कक्ष उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना लेखीपत्राद्वारे दिले. कर्जत तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष व ॲड. कैलास शेवाळे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ॲड विलास गुंजाळ, तसेच कर्जत बार असोसिएशनचे सचिव ॲड. अविनाश मते उपस्थित होते.
कर्जत येथे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाले असून, लवकरच ते कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या न्यायालयीन इमारतीवर दुसरा मजला बांधावा, तसेच दोन स्वतंत्र न्यायाधीश कक्ष उभारण्याची मागणी ॲड. शेवाळे यांनी यापूर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
सभापती प्रा. शिंदे यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कर्जत न्यायालयासाठी अतिरिक्त मजला व न्यायाधीश कक्षासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्च न्यायालयाकडून प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर विद्यमान इमारतीवर अतिरिक्त मजला बांधण्याच्या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे कर्जत न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचा प्रश्न सुटला असून न्यायालयीन सुविधांचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती ॲड. शेवाळे यांनी दिली.
सध्या कर्जत येथील न्यायालयाचे कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले असून, वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर होण्यासाठी कर्जत बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे मोठा पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. आता नागरिकांना सीनियर डिव्हिजन न्यायालय प्रत्यक्ष सुरू होण्याची प्रतीक्षा असून, ते लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास ॲड. शेवाळे यांनी व्यक्त केला.