Unseasonal Rain Crop Damage Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: कर्जत-चिलवडीत अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

वादळी वाऱ्याने घरांचेही नुकसान; कांदा शेतकरी दुहेरी संकटात

पुढारी वृत्तसेवा

राशीन: कर्जत तालुक्यातील चिलवडी परिसराला शुक्रवारी (दि. 24) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे शेतातील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून आकाशात ढग दाटून येतात. शुक्रवारी रात्री चिलवडी येथे वादळाने बंडू विठ्ठल नवले यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरातील संसारोपयोगी सर्व वस्तूंचे नुकसान झाले . तसेच पाच पोती गहू व लसूण पावसाने भिजला. तसेच होलेवाडी येथील प्राथमिक शाळेतील किचन शेडचे पत्रे उडून गेले. चिलवडी गावठाण प्राथमिक शाळेच्या एका वर्गा खोलीचे सात पत्रेे उडून गेल्याचे चिलवडीचे सरपंच राजू हिरभगत यांनी सांगितले.

प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील व चिलवडीचे सरपंच राजू हिरभगत यांनी केली.

सध्या गावरान कांदा काढणीस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चालू वर्षी मात्र एप्रिल महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे . एक तर कांद्याला पाच ते दहा रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनेव काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून द्राक्षे व इतर फळबागा व कांदा पिके घेतली होती. परंतु अवकाळी पावसामुळे त्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले आहे. एकीकडे खत, बियाणे , औषधे आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे बाजारभाव समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीची शासकीय पातळीवरून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT