कर्जत: कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून, कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे वृत्त समजताच कर्जत न्यायालय परिसरात वकिलांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.
या वेळी तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात उपाध्यक्ष ॲड. दत्ता चव्हाण, सचिव ॲड. अविनाश मते, ॲड. सचिन रेणुकर, ॲड. संजय गवारे, ॲड. नामदेव खरात, ॲड. भाऊसाहेब क्षीरसागर, ॲड. बी. बी. बागल, ॲड. शिवाजीराव गुंजाळ, ॲड. संजीवन गायकवाड, ॲड. आर. आर. जाधव, ॲड. उत्तम नेवसे, ॲड. अभय खेतमाळस, ॲड. संदीप पाटील, ॲड. सैफ सय्यद, ॲड. विनोद लष्कर आदी उपस्थित होते.
या वेळी ॲड. शेवाळे म्हणाले की, कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व वकिलांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरल्यामुळेच यास मान्यता मिळाली आहे.
ते पुढे म्हणाले की, यासाठी आर्थिक तरतुदी तत्काळ करण्यात आल्या आहेत. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, हा निर्णय दोन्ही तालुक्यांतील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे. या निर्णयामुळे कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित होणार असून, न्यायदान प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि प्रभावी होणार आहे. त्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून, वेळ व खर्चाचीही बचत होईल. लवकरच याचे उद्घाटनही करण्यात येईल, असे शेवाळे म्हणाले.
राज्य शासनाने वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार या न्यायालयासाठी एका न्यायिक अधिकाऱ्याचे पद, शासकीय अभियोक्ता कार्यालयासह सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची २२ पदे, तसेच ७ मनुष्यबळाच्या सेवा मंजूर केल्या आहेत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे कर्जत व जामखेड तालुक्यातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.