Karanji Flood Damaged Pudhari
अहिल्यानगर

Karanji Flood: करंजीच्या महापुराला वर्ष पूर्ण; काळरात्रीच्या जखमा आजही ताज्याच!

१५ सप्टेंबर २०२५ची भयावह आठवण कायम; घरे, जनावरे, वाहने आणि शेतीचे मोठे नुकसान, अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित

पुढारी वृत्तसेवा

करंजी: करंजी येथे झालेल्या अतिवृष्टीला आणि आलेल्या महापुराला आज एक वर्ष पूर्ण होत असून, १५ सप्टेंबरचा तो छातीत धडकी भरवणारा दिवस आणि ती काळरात्र आजही करंजीकरांच्या डोळ्यासमोरून नजरेआड होत नाही.

१५ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टीने करंजी गावावर अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गाव परिसरातील पाझर तलाव, नालाबांध, बंधारे, नदी-नाले तुडुंब भरले. पहाटेच्या सुमारास डोंगराच्या दिशेने पाण्याचा प्रचंड लोंढा वाहू लागला आणि पहाटे पाचपासून महापुराने गावाच्या सर्व सीमा ओलांडत करंजीला अक्षरशः वेढा घातला.

या महापुराच्या तडाख्यात नदीकाठच्या अनेक कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. शेळ्या, गाई, बैल, कोंबड्या, घरातील संसारोपयोगी साहित्य, दोनचाकी व चारचाकी वाहने अशा अनेक वस्तू पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या. अनेकांचे जीव थोडक्यात बचावले; मात्र अनेक कुटुंबांच्या संसाराची घडी या महापुराने पूर्णपणे विस्कटून टाकली. कुणाची घरे वाहून गेली, तर नदीकाठचे नागरिक घरात अडकून पडले, कुणाची दुकाने उद्‌ध्वस्त झाली, तर कुणाच्या शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले.

१५ सप्टेंबर २०२५ रोजी करंजी गावावर आलेले हे संकट आजही विसरता येणारे नाही. अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या जखमा वर्षभरानंतरही ताज्याच आहेत. महापुराच्या त्या काळ्या आठवणी आणि त्याच्या खुणा आजही गावात कायम आहेत. महापुरानंतर करंजी गावाची परिस्थिती पाहून जिल्ह्यासह राज्यभरातील विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठान आणि संघटनांनी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. काहींना प्रशासकीय मदतही मिळाली, तर काहीजण आजही प्रतीक्षेत आहेत.

अतिवृष्टीनंतर आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करंजी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि मदत मिळवून देण्याचे प्रयत्नही करण्यात आले. करंजी गावावर आलेल्या या महापुराची दाहकता केवळ जिल्ह्यापुरती किंवा राज्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर या आपत्तीची दखल देशपातळीवरही घेतली गेली.

या भीषण आपत्तीला वर्ष उलटून गेले, तरी अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक रस्ते, पूल, बंधारे आणि इतर सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले. त्यापैकी अनेक कामे आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानीची आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महापुराचे पाणी ओसरले, पण करंजीकरांच्या आयुष्यात निर्माण झालेली संकटाची दरी आजही भरून निघालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT