Kanhobachi Wadi ZP School Pudhari
अहिल्यानगर

Kanhobachi Wadi ZP School: पाथर्डीतील या शाळेत तीन विद्यार्थी, दोन शिक्षिका; मॅडम येईपर्यंत पालकांचा पहारा

कान्होबाची वाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे धक्कादायक वास्तव; मॅडम येईपर्यंत विद्यार्थ्यांवर पालकांना ठेवावा लागतो पहारा

पुढारी वृत्तसेवा

विलास मुखेकर

करंजी: अभिजीत दिपके यांची ‘स्कूल ठीक करो’ मोहीम चर्चेत असतानाच करंजीजवळील (ता. पाथर्डी) एका जिल्हा परिषद शाळेबद्दलची सार्वत्रिक अनास्था समोर आली आहे. सोयी-सुविधांसह चकाचक वर्गखोल्या ज्ञानदानासाठी सज्ज आहेत. मात्र शिक्षक आणि गावकरी-पालकांच्या अनास्थेने अवघे तीन विद्यार्थी पायपीट करत ज्ञानार्जनासाठी येतात. या तिघांना शिकविणाऱ्या दोन ‘मॅडम’ने शाळेच्या वेळेची घंटा मुकी केली आहे. परिणामी मॅडम येईपर्यंत विद्यार्थ्यांभोवती पालकांना पहारा द्यावा लागत असल्याचे वास्तव निदर्शनास आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वत्र कात टाकत आहेत, तसेच गुणवत्तेसाठीही नावाजल्या जात आहेत. मात्र अनेक शाळांच्या वर्गखोल्या आणि सुविधांबाबत तक्रारी येतात. दुसरीकडे वर्गखोल्याही आहेत आणि सुविधाही; पण विद्यार्थीच नाही, अशी अवस्था दिसून येते. त्याचेच एक उदाहरण जिल्ह्यातील करंजी (ता. पाथर्डी) येथील कान्होबाची वाडी येथील शाळेबाबत पाहायला मिळाले. चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून केवळ तीन विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षिकांची नियुक्ती आहे. शाळेच्या या पटसंख्येला शाळा व्यवस्थापनाची अनास्था, शिक्षकांचे दुर्लक्ष कारणीभूत, की खासगी शाळांचा प्रभाव, याबाबत ठोस कारण कोण शोधणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण काहीही असले, तरी शाळा टिकविण्यासाठीच्या प्रयत्नांची वानवाही तेथे जाणवत आहे.

मध्यंतरी जपानमधील एक माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. एका खेड्यातून केवळ एकच मुलगी शहरातील शाळेत जात असते. मात्र ती शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून केवळ त्या गावातून त्या एकट्या मुलीसाठी एक रेल्वेगाडी रोज ये-जा करते. म्हटले तर ही अगदी साधी कथा; पण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. या पार्श्वभूमीवर कान्होबाची वाडी येथील शाळेच्या अवस्थेकड़े पाहिले तर ही अनास्था कधी संपणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. पाथर्डी तालुक्यातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी केंद्रशाळेच्या अंतर्गत येते. या शाळेत अवघे तीन विद्यार्थी. त्यात एक मुलगी अन्‌ मुलगा तिसरीत आणि एक मुलगा पहिलीत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षिका कार्यरत आहेत. मंगळवारी (दि. ८) शाळा भरण्याची वेळ झाली. विद्यार्थी पोहोचले; पण शिक्षिकेचा पत्ता नव्हता. शिक्षिका येईपर्यंत एका विद्यार्थ्याच्या पालकावर तेथे थांबण्याची नामुष्की आली. प्रस्तुत प्रतिनिधीने शाळेतील एकूण विद्यार्थ्यांसोबत त्यांचे छायाचित्र घेतले. काही वेळाने एक शिक्षिका आल्या.

सहकारी शिक्षिका रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले! आदल्या दिवशीही शाळा मिटिंगसाठी लवकर सोडल्याचे समजले. तीनच विद्यार्थी आणि दोन शिक्षक, तरी ज्ञानदानाविषयी अनास्था असेल, तर गावातील मुलांच्या भवितव्यासाठी शाळा वाचविण्याचे प्रयत्न कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. करंजी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कान्होबाची वाडी आणि त्याशेजारील खंडोबाचीवाडी यांचा समावेश होतो. उपसरपंच अर्जुन आबासाहेब अकोलकर म्हणाले, कान्होबाची वाडी शाळेची पटसंख्या सातत्याने कमीच होत आहे. तशी गावातच विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. गेल्या वर्षी शाळेत नऊ विद्यार्थी होते. त्यातील चौथीचे तिघे उत्तीर्ण होऊन गेले. उरलेल्यांपैकी चौघांना त्यांच्या पालकांनी खासगी शाळेत टाकले. सध्या बालवाडीत चार-पाच मुले आहेत, ते पुढल्या किंवा त्यापुढल्या वर्षी या शाळेत येतील. अन्य पालकांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या शाळेत मुलांना वस्त्यांवरून आणून सोडणे पालकांना शक्य होत नाही. त्यात खासगी शाळेची बस दारात येते. म्हणून इथली पटसंख्या घटली. शाळेला फर्निचर, शिक्षिकांची गैरसोय होऊ नये म्हणून टॉयलेट, इंटरॅक्टिव्ह बोर्ड अशा सोयी केल्या. नव्या वर्गखोल्यांसाठी बारा लाख मंजूर आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सर्व प्रयत्न सुरू आहेत. पण काय करणार, गावात मुलांची संख्याच कमी आहे. पण तरी आम्ही ही शाळा बंद होऊ देणार नाही, असा निर्धारही ते व्यक्त करतात.

कान्होबावाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तेथील पट मात्र तीन असून दोन शिक्षक आहेत. यातील एका शिक्षिकेची तात्पुरती प्रतिनियुक्ती करण्यात येणार आहे. पवित्र पोर्टलमधून नव्या शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कान्होबाची वाडीच्या शिक्षिकेला प्रतिनियुक्तीचे ठिकाण ठरविले जाणार आहे. तेथील शाळा उशिराने भरते, लवकर सुटते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळा पाळल्या जात नसल्याची बाब गंभीर आहे. करंजी केंद्रांतर्गत येणाऱ्या या शाळेतील शिक्षकांची उपस्थिती व प्रत्यक्षातील परिस्थिती तपासणीसाठी केंद्रप्रमुखांना पाठविले जाईल. शाळेतील पट आणि तेथील दोन शिक्षिकांची नियुक्ती पाहता तेथील एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती केली जाईल. गटविकास अधिकाऱ्यांच्या मान्यता व मंजुरीने प्रतिनियुक्तीची आदेश जारी केले जातील. पट कमी असला तरी शाळा बंद करता येत नाही. त्यासाठी शाळा व्यवस्थान समितीची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांचे समायोजन करावे लागते.
सचिन राख, गटशिक्षणाधिकारी, पाथर्डी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT