नगर तालुका : अहिल्यानगर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका कांदा व भाजीपाल्याच्या पिकांसह फळबागांनाही बसला. मंगळवारी (दि. 27) तर अतिवृष्टीने दक्षिण पट्ट्यात तांडवच केले. पूर्वा, वालुंबा या नद्यांच्या महापुराने शेतीसह घरांचे व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी 45 गावांसाठी 185 कर्मचार्यांची नियुक्ती केल्याची आणि हे पंचनामे एक जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.
मे महिन्यात वळवाच्या पावसाने तालुक्यात थैमान घातले होते. त्यातच मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण पट्ट्याला अक्षरशः झोडपून काढले. वाळकी, खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, भोरवाडी परिसरात नद्या-नाल्यांना आलेल्या महापुराने खूपच विदारक परिस्थिती निर्माण झाली होती.
पिकांसह, शेती, घरे, जनावरांचे गोठे व इतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका तालुक्यातील 45 गावांना बसला. नुकसानीचे पंचनामे एक जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आलेल्या अहवालानंतर आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. पंचनाम्याच्या कामासाठी नियुक्त अधिकार्यांनी दररोज सायंकाळी नोडल अधिकार्यांना अहवाल सादर करायचा आहे.
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने 75 महसूल, 53 ग्रामविकास विभाग व 45 कृषी विभागाचे कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे दहा नोडल अधिकारी व त्यावर नियंत्रणासाठी निवासी नायब तहसीलदार गौरव दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचनामे तातडीने होण्यासाठी दररोज संध्याकाळी आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले.
अकोळनेर, सारोळा कासार, खडकी, वाळकी, शिराढोण, चिचोंडी पाटील, शिंगवे, मजले चिंचोली, हातवळण, मठ पिंपरी, भोयरे पठार, चास, हिवरे झरे, वाकोडी, नेप्ती, भातोडी पारगाव, गुणवडी, भोरवाडी, नालेगाव, दरेवाडी, राळेगण, जाधववाडी, रुईछत्तीसी, बुरुडगाव, वाळुंज, पारगाव मौला, दहिगाव, सोनेवाडी, देऊळगाव सिद्धी, आरणगाव, अंबिलवाडी, बाबुर्डी घुमट, भोयरे खुर्द, घोसपुरी, साकत खुर्द, नारायणडोह, पिंपळगाव कवडा, केडगाव, वडगाव तांदळी, उक्कडगाव, वाटेफळ, गुंडेगाव, टाकळी खादगाव.