

नगर: जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आपत्ती निवारण कक्ष अलर्ट झाला आहे. नगर आणि पारनेर तालुक्यात 140 मि.मी. असा मोठा पाऊस झाल्याने त्या ठिकाणच्या 40 बंधार्यासह 10 ते 12 पाझर तलाव फुटण्याची भिती आहे. जिल्हाधिकार्यांना तसा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यात, गत दोन दिवसांमध्ये नगर आणि पारनेर तालुक्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडल्याचे दिसले. नगर तालुक्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवानांच्या मदतीने अक्षरशः रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागले. याच पार्श्वभूमीवर लघु पाटबंधारे आणि जलसंधारण विभागांतर्गत येणार्या बंधार्यासह पाझर तलावांचीही पाहणी करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद लघू व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डपकर यांच्यासह उपअभियंता आनंद रुपनर यांनी आपल्या टीमसोबत ठिकठिकाणी पाहणी केली. रुपनर यांनी सारोळा कासार (नगर) आणि अस्तगाव (पारनेर) येथील तलावांची पाहणी केली. तर वाळकी गटात डपकर हे पथकासह दिसले. यावेळी केलेल्या पाहणीत बंधारे, पाझर तलावांची क्षमता, त्यात साठलेले पाणी, संभाव्य धोके, त्यासाठी आवश्यक उपाययोजना, याबाबतची माहिती घेण्यात आली. या पाहणी दरम्यान, जिल्ह्यातील साधारणतः 40 बंधारे धोकादायक आहेत. तसेच 10 ते 12 पाझर तलावही फुटण्याची शक्यता आहे. अतिक्रमणांमुळे भराव धोकादायक बनले आहेत. सांडव्यांवरून पाणी पडत आहे. अशावेळी उंची वाढवणे किंवा पाणी बाहेर काढणे, या पर्यायांवर चर्चा केली जात आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना तसा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे समजले.