

राहाता : निळवंडेचे पाणी येणार नाही, अशी टीका करणार्यांना प्रत्यक्ष पाणी पाझर तलावामध्ये आणून उत्तर दिले आहे. जोपर्यंत निळवंडेचे पाणी येत नाही, तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झाला आहे.
जनतेच्या विकासाठी विखे परीवार कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही देत, शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदर्श शिर्डी करीता ‘गुन्हेगारी मुक्त शिर्डी’ हा आपला संकल्प आहे तोही पूर्णच करणार, असे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
राहाता तालुक्यातील कोर्हाळे, डोर्हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलाव्याच्या जलपूजन प्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, निळवंडे कालव्यांची केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि स्व. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे. कालव्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाणी आपल्याला उपलब्ध झाले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 150 फुट चढ असताना या गावांना पाणी मिळाले. निळवंडेचे पाणी प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. 40 वर्ष संघर्ष केला, त्याला आता यश आले आहे या पाण्याचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी करा. पाण्यावरून कायमच टीका होत गेली, पाणी आल्याने ह्या टीकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री विखे पाटील हे शब्द पूर्ण करणारे नेते आहेत. आम्ही आपल्या सोबत आहोत असे वातावरण या भागात होत आहे. शिर्डी मतदार संघ कायमच विखे पाटलांबरोबर राहिलेला आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना भविष्यामध्ये 25 वर्षाचा विचार करून शिर्डी मतदार संघाची बांधणी करणार असल्याचे सांगून शिर्डी एमआयडीसीमध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून 167 कोटींचा प्रकल्प, शासकिय आय.टी.आय, बायपासचे चौपदरीकरण, रोजगार निर्मीती, ऊस शेतीच्या माध्यमातून या भागाला समृद्धी देता येणार असल्याचेही ते म्हणाले.
निळवंडे पाणी प्रश्न सोडावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेलो. आज जलसंपदा खाते हे काय करू शकते, याचे मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष कामातून विरोधकांना उत्तर दिले आहे, असेही डॉ. विखे म्हणाले.
या परिसरातील विखे पाटलांच्या अनेक विरोधकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आम्ही आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही या निमित्ताने दिली. गावोगावी नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे उस्फुर्त स्वागत केले.
या भागाचे वातावरण पाहून काही जण इकडे आले, परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. येथील जनतेने विकासाला आणि पाणी देणार्या नेतृत्वाला अर्थात मंत्री विखे पाटील यांना आठव्यांदा मतदान करून निवडून दिले आहे. पाणी आल्याने जिरायत भाग समृध्द झाला आहे. ज्यांनी विखेना विरोध केला, त्यांना त्यांची चुक समजली आहे. त्यामुळे तेही आपल्या सोबत येत आहे. आपण जे ठरवतो तेच करतो, आता शेजार्यांच्या प्रेमात पडू नका, असेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हणाले.