नगर तालुका: जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती.
बिबट प्रवण क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे दोन महिने तालुक्यातील बहुतांशी भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत होता. जेऊर परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन, तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या होत्या. तसेच बिबट्याचा वावर मानव वस्तीत आढळून येत असल्याने महावितरणच्या जेऊर उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या गावांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता.
महावितरणतर्फे मागील आठवड्यात विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकऱ्यांसाठी पुन्हा रात्री वीज पुरवठा सुरू केला होता. सद्यःस्थितीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा, गावरान कांदा, लसूण, चारा पिके अशा सर्वच पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे.
पाणी उपलब्ध असूनही रात्रीच्या विजेमुळे शेतकरी वर्गामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी भीतीचे वातावरण तयार झाले होते. याबाबत जेऊर, डोंगरगण, पिंपळगाव, मांजरसुंबा, बहिरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत मागणी केली होती.
रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना तत्काळ दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात यावा यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार महावितरणतर्फे रविवार (दि. 18)पासून जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसा वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी कर्डिले यांचे आभार मानले.