Jeur Daytime Electricity Pudhari
अहिल्यानगर

Jeur Daytime Electricity Farmers Demand: बिबट प्रवण जेऊर परिसरात शेतकऱ्यांची दिवसा वीज देण्याची मागणी

रात्रीची वीज सुरू केल्याने रोष; आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: बिबट प्रवण क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु हा निर्णय फक्त नावालाच महिना- दोन महिन्यांसाठी घेण्यात आला. त्यानंतर 28 जानेवारीपासून पुन्हा शेतकऱ्यांसाठी रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरू झाल्याने जेऊर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. गावोगावी बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारी केल्या जात होत्या. निंबळक, खारेकर्जुने परिसरात चिमुकल्यांवर बिबट्यांचा हल्ला मन हेलकावून टाकणारी घटना घडली होती. मानव वस्तीत बिबट्यांचा वावर आढळून येत होता. रात्री अपरात्री शेतकऱ्यांसाठी पिकांना पाणी देणे धोकादायक असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता.

दिवसा वीज हा निर्णय फेल गेल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात आला आहे. जेऊर परिसरात महावितरण कंपनीकडून 28 जानेवारीपासून शेतकऱ्यांसाठी विजेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पुन्हा रात्रीची वीज शेतकऱ्यांना सोडण्यात येत आहे. दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना दिवसा उपलब्ध होईल, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

सद्यस्थितीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा, गावरान कांदा, लसूण, चारा पिके सर्वांनाच पाणी देण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे गरजेचे असताना देखील शेतकऱ्यांसाठी रात्रीची वीज सोडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर व पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात बिबटे नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शेतकऱ्यांमध्ये अद्याप बिबट्याच्या दहशतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज द्या, अशी मागणी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.

तालुक्यातील खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला आहे. खरीप हंगामातील तोट्यामुळे शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडलेला असताना देखील बळीराजांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु विजेचा खेळखंडोबा व शेतकऱ्यांसाठी रात्रीची वीज, यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिवसांनीच मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महावितरण कारभाराबाबात नाराजी

मागील महिन्यात शेतीच्या विजेचे वेळापत्रक बदलवून रात्रीची वीज सोडण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेतली होती. कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु पंधरा दिवसांतच तो निर्णय रद्द करून पुन्हा शेतकऱ्यांना रात्रीची वीज सुरू करण्यात आली. त्यामुळे महावितरणबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

ज्वारी, चारा पिकांची उंची वाढली आहे. डोंगराच्या कडेला मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. अशा ठिकाणी दिवसा पिकाला पाणी देण्यास भीती वाटते. रात्रीची वीज असल्यामुळे बळीराजाला नाविलाजास्तव अशा धोकादायक ठिकाणी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावेच लागते. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याची गरज आहे.
नंदू केरु तोडमल, शेतकरी, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT