जायकवाडी धरण भरले; ‘रब्बी’ला मिळणार दिलासा Pudhari
अहिल्यानगर

Jayakwadi dam full: जायकवाडी धरण भरले; ‘रब्बी’ला मिळणार दिलासा

जिल्ह्यातील धरणांत 99 टक्के पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

नगर: जायकवाडी धरणात सोमवारी सायंकाळी 102.21 टीएमसी पाणीसाठा नोंदविला गेला आहे. हे धरण 99.49 टक्के भरले असून, 18 दरवाजे सरासरी एक फूट उंचीपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या धरणातून 14 हजार 672 क्यूसेेक विसर्ग गोदावरी पात्रात सुरु आहे.

नगर जिल्ह्यातील सर्वच नऊ धरणांत 98.88 टक्के म्हणजे 50 हजार 522 दलघफू पाणीसाठा उपलब्ध झाला. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिके पावसाअभावी कसेतरी तगले आहेत. धरणे ओव्हर फ्लो झाल्याने आगामी रब्बी हंगामाला चांगले दिवस येणार असल्याची परिस्थिती आहे.

यंदा भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा आदी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे ऑगस्टअखेर ओव्हर फ्लो झाली आहेत.

नाशिक जिल्ह्यात नगरपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदी कायमच वाहती राहली.. त्यामुळे जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा महिनाभरापूर्वीच पूर्ण झाल्याने अहिल्यानगरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

धरणाची एकूण क्षमता 102.73 टीएमसी आहे. सोमवारी (दि.1) सायंकाळी सहा वाजता या धरणात 102.21 टीएमसी पाणीसाठा झाल्याने हे धरण 99.49 टक्के म्हणजे ओव्हर फ्लो झाले. गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात विसर्ग सुरुच आहे.

रतनवाडीत सर्वाधिक 4687 मिलिमीटर नोंद

भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा आदी धरणांच्या पाणलोटात आतापर्यंत जोरदार पाऊस झाला. रतनवाडी परिसरात सर्वाधिक 4 हजार 687 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय घाटघर येथे 4 हजार 553, पांजरे येथे 2 हजार 863, वाकी येथे 1 हजार 966, भंडारदरा 2 हजार 300, निळवंडे 953, मुळा 306, कोतूळ येथे सरासरी 437 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

प्रवरा, गोदावरी व मुळा दुथडी

धरणांतून नदीपात्रांत विसर्ग सुरु असल्यामुळे जिल्ह्यातून वाहणार्‍या गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा नद्या सध्या दुथडी वाहू लागल्या आहेत. सोमवारी (दि.1) रात्री नऊ वाजता भीमा नदीत 7 हजार 410 क्यूसेक, गोदावरीत 3 हजार 155, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 6 हजार 564, निळवंडे धरणातून 7 हजार 155 तर ओझर बंधार्‍यातून 5 हजार 45, मुळा नदीत अडीच हजार विसर्ग सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT