नगर: गंज बाजार, सर्जेपूरा येथील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक, सावित्रीबाई फुले फेज 1 व फेज 2, भाग्योदय - बालाजी कॉलनी, जुना दाणे डबरातील व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना महापालिकेने जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर आता सिद्धार्थनगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील 14 गाळेधारकांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.
गाळेधारकांकडे 12.44 लाख रुपयांची थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. (Latest Ahilyanagar News)
महापालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे 25 कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महापालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सिद्धार्थनगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांकडे 12.44 लाखांची थकबाकी आहे. तसेच, बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 81(ब) नुसार जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
थकबाकी वसुलीसाठी महापालिका कठोर कारवाई सुरू करणार आहे. त्यामुळे गाळेधारकांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.