Pravara River Pudhari
अहिल्यानगर

Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ९१ टक्के भरले; नगर-नाशिकच्या पावसाने गोदावरी, प्रवरा, भीमा नद्यांना पूर

भंडारदरा, निळवंडेसह धरणांतून विसर्ग कायम; जायकवाडीत ९३.४१ टीएमसी पाणीसाठा, दारे उघडण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नगर: नगर व नाशिक जिल्ह्यांतील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच असल्‍यामुळे धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरुच आहे. त्‍यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा भीमा, घोड, कुकडी आदी नद्या दुथडी वाहत आहेत. गोदावरी व प्रवरा या वाहत्‍या नद्यांमुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळीत वाढ होऊन हे धरण ९१ टक्‍के भरले आहे.

जुलै महिन्‍यात नगर व नाशिक या दोन्‍ही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. त्‍यामुळे भंडारदरा, निळवंडे, आढळा आदी तीनही धरणे ओव्‍हरफ्‍लो झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्‍याने तेथील धरणेदेखील जवळपास भरली आहेत. त्‍यामुळे या धरणांतील विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्‍यात आला. त्‍यामुळे ही नदी वाहती होऊन जायकवाडी धरणाची पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच असल्‍याने भंडारदरा, निळवंडे या धरणांतून प्रवरा नदीपात्रत विसर्ग सुरुच आहे. गेल्‍या दोन महिन्‍यांत या दोन्‍ही नद्यांच्‍या माध्‍यमातून जायवाडी धरणांत सोमवारी (दि.३) सकाळपर्यंत ४६ टीएमसी पाणी पोहोचले. या धरणाचा सायंकाळी सहा वाजता एकूण पाणीसाठा ९३.४१ टीएमसी इतका नोंदविला गेला आहे. यामध्‍ये ६७.३५ टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे. आगामी दिवसांत आवक वाढण्‍याची शक्‍यता असल्‍याने जायकवाडी धरणाची दारे कोणत्‍याही क्षणी उघडण्‍याची शक्‍यता जलसंपदा विभागाने व्‍यक्‍त केली.

रविवारी (दि.२) सकाळी ६ ते सोमवारी (दि.३) सकाळी ६ वाजता या २४ तासांत भंडारदर्‍यात ५१ मिलिमीटर, निळवंडे येथे १७, रतनवाडीत ८४, घाटघर १३०, पांजरे ५३, वाकी ४९ तर कोतूळ येथे १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्‍यामुळे भंडारदरा धरणात २४ तासांत ५५१, निळवंडेत ६०९, मुळा धरणात ८६१ व आढळा धरणात १७ दलघफू इतका पाणीसाठा दाखल झाला आहे. त्‍यामुळे आजमितीस भंडारदरा, मुळा आदींसह नऊ धरणांत ८०.७६ टक्‍के म्‍हणजे ४१ हजार २७९ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्‍ध आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत हा पाणीसाठा सव्‍वाचार टीएमसीने कमी आहे.

नदीपात्रांतील विसर्ग क्‍यूसेक

  • गोदावरी : २२७७०

  • भीमा : ४४३२२

  • घोड : १५०००

  • कुकडी : ४५००

प्रवरा नदी : -

  • भंडारदरा : ५२५९

  • निळवंडे : ७७५८

  • ओझर बंधारा : ६३०१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT