Jawaleshwar Rath Yatra Pudhari
अहिल्यानगर

Jawaleshwar Rath Yatra: जवळेश्वर रथोत्सवाला आजपासून प्रारंभ; शतकाहून जुनी परंपरा अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी

जामखेड तालुक्यातील जवळा येथे पाच दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; शंभर वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक सागवानी रथ ठरणार मुख्य आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: तालुक्यातील जवळा येथील ग्रामदैवत श्री जवळेश्वराच्या शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेला रथ यात्रोत्सव आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमा असा पाच दिवस चालणार असून, यात्रोत्सवास शनिवार (दि. २५)पासून प्रारंभ होत आहे. हा यात्रोत्सव बुधवार (दि. २९)पर्यंत चालणार आहे. यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेनिमित्त विविध मंडळांकडून आयोजित करण्यात येणारे नर्तिकांचे नृत्य-गायनाचे कार्यक्रम हे या यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. गावातील दहा ते अकरा ठिकाणी दररोज रात्री हे कार्यक्रम रंगतात. यात्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री जवळेश्वराची महाआरती झाल्यानंतर देवाच्या मुकुटाची रथात प्रतिष्ठापना केली जाते. या आरतीचा मान पारंपरिकरीत्या पाटील आणि कुलकर्णी कुटुंबीयांना आहे. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रेला प्रारंभ होतो. या यात्रोत्सव काळात प्रत्येक समाजाला विविध मान आहेत.

पाच ऋषींची पांढर म्हणून प्रसिद्ध

जवळा गावाला ‘पाच ऋषींची पांढर’ म्हणून ओळखले जाते. जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, बेलेश्वर आणि नंदकेश्वर अशी पाच स्वयंभू शिवलिंगे येथे आहेत. आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्यात ही शिवलिंगे प्रकट झाली.

यापैकी श्री जवळेश्वराचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून, अत्यंत भव्य आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस श्री गणपती, तर उजव्या बाजूस श्री भैरवनाथ यांची मंदिरे आहेत. मंदिर परिसराचे बांधकाम इ. स. १८१४मध्ये करण्यात आले असून, शिखराचे नूतनीकरण गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून करण्यात आले आहे.

शंभर वर्षांचा ऐतिहासिक रथ

जवळेश्वराची रथयात्रा राज्यातील ऐतिहासिक रथयात्रांपैकी एक मानली जाते. हा सागवानी लाकडाचा भव्य रथ १९व्या शतकाच्या प्रारंभी जवळा येथील कुशल सुतार येदू पंढरीनाथ सुरवसे यांनी तयार केला होता. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला आधुनिक टर्निंग व्यवस्था नसल्यामुळे रथ वळविण्यासाठी पुढील आणि मागील बाजूस बांधलेल्या जाड दोरांच्या (नाडा) साहाय्याने सुमारे ३०० ते ४०० भाविक एकत्रितपणे रथ पुढे-मागे करून वळवतात. रथात बसण्याचा पारंपरिक मान सुरवसे कुटुंबीयांचा असून, रथ ओढण्याच्या दोराचा (नाडा) मान मते कुटुंबीयांना आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT