Ahilyanagar Municipal House Tax Survey: घरपट्टीवरून महापालिकेत रणकंदन; संतप्त नगरसेवकांची घोषणाबाजी, कागदपत्रे भिरकावली

चुकीच्या सर्वेक्षणाचा आरोप; कंपनी प्रतिनिधींशी सोमवारी बैठक, मोकाट कुत्रे, गॅस पाइपलाइन, शिक्षण व सभागृहाच्या दुरवस्थेवरही प्रशासनाला धारेवर
Ahilyanagar Municipal House Tax Survey
Ahilyanagar Municipal House Tax SurveyPudhari
Published on
Updated on

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. शिक्षण, शाळा, मोकाट कुत्रे, घरपट्टी, पथदिवे, जन्मदाखले, सभागृहाची दुरवस्था, सार्वजनिक सुविधा, पथदिव्यांच्या खांबावरील अनधिकृत केबल, गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदाईच्या प्रश्नावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. घरपट्टीच्या प्रश्नांवर चांगलेच रणकंदन पाहायला मिळाले. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावत घोषणाबाजी केली. अखेर नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय झाल्यानंतर वातावरण शांत झाले.

Ahilyanagar Municipal House Tax Survey
Milk Price: दुधाला 70 रुपये हमीभाव द्या; दूध उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

महानगरपालिकेची सर्वसाधारण महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, नगर सचिव मेहेर लहारे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरूडे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक सुरेश बनसोडे, भाजपचे नगरसेवक निखील वारे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मनोज कोतकर, दत्तात्रय गाडळकर, रवींद्र बारस्कर, करण कराळे, ॲड. ऋगवेद गंधे, महेश लोंढे, नवनाथ कातोरे, दत्तात्रय कावरे आदी चर्चेत सहभाग घेतला.

Ahilyanagar Municipal House Tax Survey
Vikhe Patil Statement| सरकार चर्चा करायला तयार: मंत्री विखे

महापालिकेत प्रशासक असताना एका खासगी कंपनीमार्फत शहरात घरपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाले असून, सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा घरपट्टी आली आहे. तर दुसरीकडे, पैसे घेऊन घरपट्टी कमी करून देण्यासाठी ‘सेटलमेंट’ केली जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक गणेश भोसले यांनी ५ हजार रुपयांच्या घरपट्टीऐवजी थेट दीड लाख रुपयांची आकारणी झाल्याची उदाहरणे देत, काही ठिकाणी पैसे घेऊन कर कमी केल्याचे गंभीर आरोप केले. एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. करण कराळे यांनी भाडे उत्पन्नाच्या आधारावर चुकीची आकारणी झाल्याचा आरोप केला. मोकळ्या भूखंडधारकांकडील ३३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मागणी त्यांनी केली. महापालिका ही ‘ईस्ट इंडिया कंपनी नाही’, असे म्हणत भाडे उत्पन्नावर ४० टक्के कर आकारणी करून नये, अशी मागणी कुमारसिंह वाकळे यांनी केली. संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे यांनी मालमत्ता नावनोंदणीवेळी आकारण्यात येणारे १ टक्का शुल्क रद्द करण्याची मागणी केली.

Ahilyanagar Municipal House Tax Survey
Wari Special ST Bus: वारकऱ्यांसाठी लालपरी आता थेट गावात! पारनेर आगाराच्या ३० विशेष गाड्या धावणार

आयुक्त डांगे यांनी तक्रारी असतील तर अ‍ॅफिडेव्हीट द्या, असे सांगितल्यावर नगरसेवक प्रकाश भागानगरे, गणेश भोसले आक्रमक झाले. त्यानंतर आक्रमक झालेल्या गणेश भोसले यांनी संताप व्यक्त करत तक्रारीची फाईल व्यासपीठाच्या दिशेने भिरकावली. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कंपनीच्या प्रतिनिधींना तातडीने सभागृहात बोलावण्याची मागणी नगरसेवकांनी केली. नगरसेवक निखील वारे यांनी कंपनीवर कारवाई करून सर्व्हेक्षणाची रॅडम तपासणी करण्याची मागणी केली. महापौर आणि उपमहापौर यांनी संबंधित कंपनीला नोटीस बजावून बोलावले जाईल, असे सांगितले. अखेर आयुक्तांनी सोमवारी (दि.२७) सर्व नगरसेवकांसमवेत कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्याची घोषणा केली आणि तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यात आला. भारत गॅस पाइपलाइनसाठी शहरातील नव्याने तयार झालेले रस्ते खोदले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. रस्ते खोदाईला नगरसेवकांनी तीव्र विरोध केला.

दरम्यान, नगरसेवक संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभागृहातील पाणी गळती, टेबलांची दयनीय अवस्था व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा विषय अनेक वेळा मांडला आहे. प्रत्येक वेळी आश्वासने दिली जातात; पण प्रत्यक्षात काहीच होत नाही,” असे सांगत आक्रमक भूमिका घेतली.

दुबार नोंदीची पडताळणी होणार

नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी जन्मदाखल्यांबाबत सुमारे १५ हजार डुप्लिकेट नोंदी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर डॉ. सतीश राजूरकर यांनी स्पष्ट केले की, १७ हजार नोंदी या दुबार असल्याचे म्हणता येणार नाही. जुन्या नोंदींच्या दुरुस्तीमुळे त्या वाढल्या असून समितीमार्फत तीन महिन्यांत सर्व नोंदींची पडताळणी केली जाईल.

... तर कोणालाही सोडणार नाही

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी बोल्हेगाव गावठाणातील जिल्हा परिषद शाळेची धोकादायक इमारत तातडीने पाडण्याची मागणी केली. शहर अभियंता मनोज पारखे यांनी जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. आयुक्तांनी १५ दिवसांत समन्वय साधून इमारत पाडण्याचे आश्वासन दिले. यावर कुमारसिंह वाकळे म्हणाले, “त्या इमारतीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला काही झाले तर कुणालाही सोडणार नाही. गरज पडल्यास कायदा हातात घ्यायलाही मागे-पुढे पाहणार नाही.”

Ahilyanagar Municipal House Tax Survey
Ahilyanagar Dam Water Storage: धरणांत २३ दिवसांत १५.५ टीएमसी आवक; जिल्ह्यात ५४ टक्‍के पाणीसाठा

मॉडेल शाळांसाठी जागा द्या : बारस्कर

महापालिकेकडे शहरात कुठे शाळांसाठी जागा आहे, असा प्रश्न संपत बारस्कर यांनी केला. त्यावर नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालिकाश्रम रोड व अरणगाव रस्त्यावर दोन ठिकाणी जागा असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या मॉडेल शाळा उभा करू त्यासाठी काका ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू, अशी नगरसेवक संपत बारस्कर, विकी जगताप यांनी सांगितले. त्यावर रोलिंग घेण्याची मागणी केली.

वारे यांनी केले शिक्षण विभागाचे स्टिंग

नगरसेवक निखिल वारे यांनी शाळांपासून ५०० मीटर परिसरात तंबाखू व मादक पदार्थांसह स्टिंग ची विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. “शिक्षण मंडळाने याबाबत काय कारवाई केली? शाळा आणि अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले का? शिक्षण मंडळाची जबाबदारी नाही,” असे गंभीर आरोप करीत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर महापालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी निरूत्तर झाले. महापालिकास्तरावर शिक्षण समिती स्थापन करावी, अशी मागणी केली.

बीओटी तत्त्वावर होणार व्यापारी संकुल

प्रोफेसर चौकातील व्यापारी संकुलासाठी ७५ टक्के निधी कर्ज स्वरूपात उभारणार असल्याची माहिती आयुक्त डांगे यांनी दिली. यावर नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, बाबासाहेब वाकळे व डॉ. सागर बोरुडे यांनी कर्ज घेण्यास विरोध करत बीओटी तत्त्वावर प्रकल्प राबविण्याची मागणी केली. महापालिकेने एक रुपयाही कर्ज घेऊ नये, अशी भूमिका कुमारसिंह वाकळे यांच्यासह अन्य सदस्यांनी मांडली.

कुत्रा चावल्यास खर्च मनपाने करावा : बनसोडे

नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. कुत्र्यांच्या बंदोबस्तावर लाखो रुपये खर्च होऊनही नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत. यापुढे कुत्रा चावल्यास उपचाराचा सर्व खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करणार अशा प्रश्‍नांवर अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर नगरसेवकांना आवडले नाही. त्यामुळे या प्रश्‍नावर काही तरी तोडगा काढा, असा आग्रह धरण्यात आला. याच प्रश्नावर मनोज कोतकर, सागर बोरूडेही आक्रमक झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news